Lonar students : गोव्यातील मडगाव येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो-कराटे स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विदर्भाच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मल्टी पर्पज हॉल, मडगाव (गोवा) येथे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेचे आयोजन फिफ्ट इंडिया, नीती आयोग, महाराष्ट्र इंडिया गव्हर्नमेंट असोसिएशन (गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

लोणार : गोव्यातील मडगाव येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो-कराटे स्पर्धेत लोणारच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विदर्भाच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मल्टी पर्पज हॉल, मडगाव (गोवा) येथे ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेचे आयोजन फिफ्ट इंडिया, नीती आयोग, महाराष्ट्र इंडिया गव्हर्नमेंट असोसिएशन (गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाराणा तायक्वांदो-कराटे अकॅडमी, लोणार येथील खेळाडूंनी आपल्या गटात दमदार कामगिरी करत तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिशा आदी राज्यांतील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून सुवर्णपदके पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये ज्ञानेश अनिल काळे, मैथिली अनिल काळे, समीक्षा जितेंद्र झिणे, भूमिका उमेश सानप, तेजस भगवान जाधव, एकांतकुमार संतोष राठोड, सोहम संतोष जाधव, सुनील भगवान आढे, सोमनाथ सतीश बोडखे, पूनम योगेश भालतिलक, मेहूल रविंद्र ठाकूर आणि साची मंगेश नागापूरे यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंनी तांत्रिक कौशल्य, वेगवान हालचाली, अचूक किक-पंच आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर परीक्षकांची विशेष दाद मिळवली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे लोणार तालुका, बुलढाणा जिल्हा तसेच संपूर्ण विदर्भाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले. या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची मे महिन्यात थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो-कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून हे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या यशामागे मुख्य कराटे प्रशिक्षक संतोष सखाराम जाधव, प्रशिक्षक सुनील भगवान आढे, प्रशिक्षिका चंचल वासुदेव दाते तसेच प्रशिक्षक हर्षदीप महिंद्र आठवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कठोर प्रशिक्षणामुळेच हे यश मिळाल्याची भावना पालक व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून खेळाडू, प्रशिक्षक आणि अकॅडमीचे अभिनंदन होत असून भविष्यातही लोणारचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचा झेंडा फडकावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

