Mahabreaking

[breaking_news]

loan waiver scheme : कर्जमुक्ती योजनेतील १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर, आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

loan waiver scheme : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४३६ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, या सर्व लाभार्थ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हास्तरीय कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

Loan waiver scheme

  कर्जमुक्तीचा लाभ हवा? पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता ई-सेवा केंद्रात जावे

बुलढाणा  : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४३६ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, या सर्व लाभार्थ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हास्तरीय कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, संबंधित बँक शाखा तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी या याद्यांमध्ये आपले नाव तपासून पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी फार्मर आयडी (Farmer ID) आणि आधार कार्ड सोबत घेऊन नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करून घेणे आवश्यक आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याने कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही अडचणी किंवा तक्रारी उद्भवल्यास शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय अथवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून दाद मागण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेची अंमलबजावणी सहकार विभाग, महसूल विभाग आणि बँक प्रशासन यांच्या समन्वयातून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनावश्यक गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनीही पात्र शेतकऱ्यांना विलंब न करता नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळविण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top