Jawan Ambadas Wagh : बुलढाणा तालुक्यातील सोयगाव येथील जवान अंबादास पांडुरंग वाघ (वय ४५) यांना जम्मू-काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना जवानाच्या निधनाची वार्ता सोयगाव येथे पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

‘अमर रहे…’च्या घोषणांनी दुमदुमले सोयगाव; जवान अंबादास वाघ यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
पंडित सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील सोयगाव येथील जवान अंबादास पांडुरंग वाघ (वय ४५) यांना जम्मू-काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना जवानाच्या निधनाची वार्ता सोयगाव येथे पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
जवान अंबादास वाघ यांच्या निधनाची माहिती मिळताच ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनी हळहळ व्यक्त केली. देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या जवानाचा मृत्यू झाल्याने सोयगावसह परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले.
७ ऑक्टोबर २०२६ रोजी जवान अंबादास वाघ यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सोयगाव येथे आणण्यात आले. दुपारी १२.३० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीर जवान अंबादास वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, जम्मू-काश्मीरचे शासकीय अधिकारी, धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे चिरंजीव कृष्णा भाऊ बुधवत व त्यांचे सहकारी उपस्थित होते. परिसरातील राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होता.
अंत्यसंस्कारावेळी ‘अमर रहे… अमर रहे… अंबादास वाघ अमर रहे!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी वीर जवानाला अखेरचा निरोप देताना भारतमातेच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला सलाम केला.
जवान अंबादास वाघ यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोयगावने देशसेवेसाठी समर्पित आणि कर्तव्यनिष्ठ असा एक जवान गमावल्याने संपूर्ण गाव हळहळले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

