Jatashankar Waterfall : सातपुडा पर्वतरांगेत झालेल्या जोरदार पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील प्रसिद्ध जटाशंकर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. पिकनिक पॉइंट तसेच धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पर्यटकांचे विशेष आकर्षण असून धबधबा प्रवाहित झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाने खुलले सातपुड्याचे सौंदर्य; जटाशंकर धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष
संग्रामपूर : सातपुडा पर्वतरांगेत झालेल्या जोरदार पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील प्रसिद्ध जटाशंकर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. पिकनिक पॉइंट तसेच धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पर्यटकांचे विशेष आकर्षण असून धबधबा प्रवाहित झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत अंबाबरवा अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील जटाशंकर येथे प्राचीन स्वयंभू शिवलिंग आणि नयनरम्य धबधबा प्रसिद्ध आहे. वनभ्रमंती, निसर्ग पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून या स्थळाची ओळख आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगेत अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जटाशंकर धबधबा केवळ अंशतः प्रवाहित होता. मात्र, गुरुवारपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धबधबा आता पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.
डोंगर-दऱ्या, घनदाट जंगल, विविध वृक्षवल्ली आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे संपूर्ण सातपुडा परिसर हिरवाईने नटला असून येथील विलोभनीय निसर्गसौंदर्य पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला जटाशंकर धबधबा पाहण्यासाठी आता पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

