Mahabreaking

[breaking_news]

Sand smuggling caught : सीसीटीव्हीत रेती तस्करी कैद, तरी कारवाई शून्य! महसूल यंत्रणेचा तिसरा डोळा नेमका कुणासाठी?

Sand smuggling caught : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा धरण परिसरासह नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. महसूल विभागाची पथके, बोटींची कारवाई, प्रमुख मार्गांवर कमानी अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र या सर्व उपाययोजनांनंतरही अवैध रेती वाहतूक दिवस-रात्र सुरूच असल्याचे चित्र असून, सीसीटीव्हीचा ‘तिसरा डोळा’ नेमका रेती तस्करांवर नजर ठेवतो की केवळ कागदोपत्री कारवाईसाठीच आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Sand smuggling caught

 लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही, तरीही राजरोस रेती तस्करी; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

गजानन तिडके  

देऊळगाव राजा : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा धरण परिसरासह नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. महसूल विभागाची पथके, बोटींची कारवाई, प्रमुख मार्गांवर कमानी अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र या सर्व उपाययोजनांनंतरही अवैध रेती वाहतूक दिवस-रात्र सुरूच असल्याचे चित्र असून, सीसीटीव्हीचा ‘तिसरा डोळा’ नेमका रेती तस्करांवर नजर ठेवतो की केवळ कागदोपत्री कारवाईसाठीच आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

महसूल विभागाने रेती घाट परिसरातील प्रमुख सहा मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांचे थेट लॉगिन संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे असल्याची माहिती स्वतः तहसीलदारांनी दिली आहे. म्हणजेच कोणत्या घाटातून, कोणत्या वेळी आणि किती वाहने अवैध रेतीची वाहतूक करतात, याची क्षणाक्षणाची माहिती महसूल यंत्रणेकडे उपलब्ध असते. तरीही कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद होत आहे.

पुरावे समोर, तरी तस्कर मोकाट

दिवसा आणि रात्री शेकडो ट्रॅक्टर, टिप्पर व इतर वाहने अवैध रेतीची वाहतूक करत असल्याचे फुटेज उपलब्ध असतानाही अनेक वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते. उलट मोजक्या वाहनांवरच कारवाई होत असल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शासनाने लाखो रुपयांचा खर्च करून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे जर केवळ शोभेची वस्तू ठरत असतील, तर या खर्चाला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

तहसीलदार कारवाईत सक्रिय; मग खालची यंत्रणा निष्क्रिय का?

तहसीलदार आणि त्यांची विशेष पथके वेळोवेळी अवैध रेतीविरोधात कारवाया करत असतात. मात्र संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची चर्चा महसूल वर्तुळात सुरू आहे. फुटेज उपलब्ध असतानाही स्थानिक स्तरावर कारवाई न होणे ही बाब गंभीर मानली जात आहे.

कोट्यवधींच्या रेतीवर लक्ष, पण कॅमेरे निष्प्रभ?

मंडपगाव कमान, मंडपगाव रोड, सिंगाव जहांगीर, पांगरी माळी, देऊळगाव मही तसेच खडकपूर्णा धरण परिसरातील प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणांहून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती उपलब्ध असतानाही तस्करी सुरूच आहे. त्यामुळे कॅमेरे असूनही तस्कर निर्धास्त कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

वर्षानुवर्षे एकाच भागात कर्मचारी; चर्चांना उधाण

महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे याच परिसरात कार्यरत असल्याने स्थानिक परिस्थितीचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे. त्यामुळे अवैध रेती वाहतुकीला अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. शासनाच्या बदली धोरणाची अंमलबजावणी या प्रकरणात होत आहे का, हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

  “खडकपूर्णा धरण व नदीपात्र परिसरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्राप्त होणाऱ्या फुटेजच्या आधारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पुन्हा तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.”

प्रा.संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top