Ambiya Bahar: निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे. बदलते व प्रतिकूल हवामान तसेच अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्र्याच्या आंबिया बहारातील फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. झाडावरील फळे मोठ्या प्रमाणावर जमिनीवर पडत असल्याने संत्रा पिकाचे मोठे नुकसान होत असून यंदा उत्पादनातही लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

वादळानंतर आता रोगाचा प्रादुर्भाव; शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत संत्रा उत्पादक
संग्रामपूर : निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे. बदलते व प्रतिकूल हवामान तसेच अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्र्याच्या आंबिया बहारातील फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. झाडावरील फळे मोठ्या प्रमाणावर जमिनीवर पडत असल्याने संत्रा पिकाचे मोठे नुकसान होत असून यंदा उत्पादनातही लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
यापूर्वी १ जून रोजी आलेल्या चक्रीवादळसदृश वादळामुळे संत्र्यासह विविध फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी बागा सावरल्या. मात्र बदलत्या हवामानामुळे आणि अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा फळगळ सुरू झाल्याने संपूर्ण संत्रा पीक धोक्यात आले आहे.
गत पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळे, अतिवृष्टी आणि विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली असून शासनाने नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
प्रशासकीय उदासीनतेचा संत्रा उत्पादकांना फटका
संग्रामपूर तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी फळगळीमुळे हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था तसेच कृषी विभागाने रोगनियंत्रण व मार्गदर्शनाबाबत अपेक्षित उपाययोजना न केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नुकसानभरपाईची प्रतीक्षा; शेतकरी संभ्रमात
१ जून रोजी झालेल्या चक्रीवादळसदृश वादळी वाऱ्यामुळे केळी, संत्र्यासह विविध फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर केला. मात्र जवळपास दोन महिने उलटूनही नुकसानभरपाई जाहीर झालेली नाही. त्यामुळे शासन नुकसानभरपाई देणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील ५ हजार २१ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४०३.३२ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये संत्रा – २,५९६.६४ हेक्टर, केळी – १,७४६.६३ हेक्टर, लिंबू – १९ हेक्टर, आंबा – ०.५५ हेक्टर, पेरू – १८.१६ हेक्टर, पपई – ७.६४ हेक्टर, शेवगा – १.२० हेक्टर, पानपिंपरी – ३.९० हेक्टर आणि इतर पिकांचे ८.८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
आसमानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिक्रिया
“अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्र्याला मोठ्या प्रमाणात फळगळ लागली आहे. झाडावरील फळे जमिनीवर पडत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. उत्पादन खर्च तर निघतच नाही, उलट मजुरीही घरून द्यावी लागत आहे. शासनाने संत्रा उत्पादकांना भरीव आर्थिक मदत द्यावी.”
– पवन अग्रवाल, संत्रा उत्पादक शेतकरी, सोनाळा (ता. संग्रामपूर)
“जून महिन्यातील वादळी वाऱ्यामुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाळी अधिवेशनात मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप नुकसानभरपाई जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी; अन्यथा मोठे जनआंदोलन उभारले जाईल.”
– विजय टाले, शेतकरी, सोनाळा (ता. संग्रामपूर)
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

