Dusrabid Gram Panchayat: गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी 22 एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते. ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन सिंदखेड राजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बांगर यांनी दिले. तसेच 30 एप्रिलपर्यंत अडथळे दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत सचिवाने दिल्याने ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.

दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन; 30 एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार
दुसरबीड : गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी 22 एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते. ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन सिंदखेड राजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बांगर यांनी दिले. तसेच 30 एप्रिलपर्यंत अडथळे दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत सचिवाने दिल्याने ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या आवक-जावक नोंदींमध्ये पारदर्शकता नसून घरपट्टी व नळपट्टी वसुलीतील रकमेचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय आठवडी बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा गैरवापर, बनावट बिले तयार करून निधी वळविणे तसेच विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी हा आंदोलनाचा मुख्य मुद्दा ठरत आहे. नवीन नळजोडणीच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल करूनही अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक १ व २ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपसरपंच अशोक गुंजाळ, माजी उपसरपंचपती शेख तौफिक, गजानन जगताप, शेख अबरार, आलीया अंजुम, साधना जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होते. गटविकास अधिकारी बांगर यांनी विस्तार अधिकारी पवार व विस्तार अधिकारी घुगे यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यासोबत चर्चा करून दोन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच ज्या भागात पाणी मिळत नाही त्या भागात 30 एप्रिलपर्यंत उपाय योजना करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत सचिवांनी दिले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सचिवाची बदली करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले . यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
आश्वासनांची पूर्तता होणार का?
दुसरबीड गावात गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. पाण्यासाठी काही दिवसांपूर्वी महिलांनी मोर्चा काढली. गावातील सिमेंट काँक्रीट रोड फोडल्याने खड्डे पडले आहेत. मूलभूत समस्यांसाठी नेहमीच ग्रामस्थांना आंदोलन करावे लागते. समस्यांविषयी अधिकारी केवळ आश्वासन देतात. समस्या सोडवण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थंनी केला आहे.

