missing minor girl :येथून २९ डिसेंबर रोजी सायंकाळी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध साखरखेर्डा पोलिसांनी लावला असून मुलीला पळवून नेणाऱ्या नात्यातील काकूसह एका युवकाला जळगाव खान्देश येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

साखरखेर्डा : येथून २९ डिसेंबर रोजी सायंकाळी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध साखरखेर्डा पोलिसांनी लावला असून मुलीला पळवून नेणाऱ्या नात्यातील काकूसह एका युवकाला जळगाव खान्देश येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, साखरखेर्डा येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आजीने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिली होती. मुलीला नात्याने काकू लागणाऱ्या मिराबाई पारधे हिने चिखली येथे बोलावून घेतले व तेथून तिला सोबत घेऊन जळगाव खान्देश येथे नेले. तेथे शुभम विनोद पाटील या युवकासोबत तिचा विवाह लावून दिल्याचे तपासात समोर आले. या प्रकारासाठी संबंधित महिलेने काही रक्कम घेतल्याची माहिती पोलिस चौकशीत उघड झाली आहे.
मिराबाई पारधे हिला ताब्यात घेतल्यानंतर तिचे गुजरात राज्यातील काही व्यक्तींशी संबंध असल्याचेही निष्पन्न झाले. यापूर्वीही अशाच प्रकारे काही मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे विवाह इतर समाजातील गरजू युवकांशी लावल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच सदर महिलेने स्वतः अनेक वेळा विवाह करून काही युवकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
७ फेब्रुवारी रोजी शुभम विनोद पाटील यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने मिराबाई पारधे हिनेच विवाह लावून दिल्याचे कबूल केले. दरम्यान, मिराबाई पारधे हिने तब्येत बिघडल्याचे कारण सांगून रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला होता. चिखली येथील खेडेकर रुग्णालयातून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. ९ फेब्रुवारी रोजी दोन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मिराबाई पारधे हिला न्यायालयीन कोठडी सुनावली, तर शुभम विनोद पाटील याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, काल संध्याकाळी आणखी एका युवतीने घरातून पळून जाऊन परस्पर विवाह केल्याची बाब समोर आली आहे. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. संबंधित मुलगा-मुलीच्या विवाहाचे छायाचित्र पोलिसांना प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

