Illegal prenatal : तालुक्यातील परतापूर येथे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका बोगस डॉक्टरसह त्याच्या सहकाऱ्यांना शुक्रवारी (दि. २७ जून) आरोग्य विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ पकडले. पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकारावर कारवाई करत पथकाने घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, औषधे, इंजेक्शन्स तसेच इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

गर्भलिंग निदानाच्या रॅकेटवर प्रशासनाचा धडक छापा; पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह बोगस डॉक्टर अटकेत
मेहकर : तालुक्यातील परतापूर येथे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका बोगस डॉक्टरसह त्याच्या सहकाऱ्यांना शुक्रवारी (दि. २७ जून) आरोग्य विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ पकडले. पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकारावर कारवाई करत पथकाने घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, औषधे, इंजेक्शन्स तसेच इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. या धडक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोग्य सेवा अकोला मंडळाचे आरोग्य उपसंचालक वाकचौरे यांच्या आदेशानुसार आणि बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. परतापूर येथील रसाळ यांच्या घरात बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
त्यानुसार आरोग्य विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी बोगस डॉक्टर अनिल रामदास सोनुने हा एका महिलेचे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ आढळून आला. पथकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले. घटनास्थळावरून गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन्स तसेच अन्य वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीयतेने यशस्वीरीत्या पार पडली. या संयुक्त पथकात पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस कर्मचारी लक्ष्मण कटक, शिवनकर, संदीप भोंडाने, मोहम्मद परसूवाले, केशव अवचार, महिला पोलीस कॉन्स्टेबल सरकटे तसेच श्रीमती मंगला वायाळ (स्टाफ नर्स), प्रशांत बोरे आणि अधिपरिचारिका वायाळ (वरिष्ठ लिपिक) यांचा सहभाग होता.
कायद्याने बंदी असलेल्या गर्भलिंग निदानाच्या या बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे. संशयित आरोपींविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

