Arun Mokal : महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासकीय सेवेतील कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख असलेले अरुण मोकळ यांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मुख्याधिकारी गट-अ (वर्ग-१) तथा उपायुक्त (Deputy Commissioner) पदावर पदोन्नती दिली आहे. जून २०२६ मध्ये जाहीर झालेल्या या पदोन्नतीकडे देऊळगाव राजा शहरात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय विकासकामांची शासनाने दिलेली पावती म्हणून पाहिले जात आहे.

देऊळगाव राजाच्या विकासाचे शिल्पकार अरुण मोकळ; उपायुक्तपदी बढती
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासकीय सेवेतील कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख असलेले अरुण मोकळ यांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मुख्याधिकारी गट-अ (वर्ग-१) तथा उपायुक्त (Deputy Commissioner) पदावर पदोन्नती दिली आहे. जून २०२६ मध्ये जाहीर झालेल्या या पदोन्नतीकडे देऊळगाव राजा शहरात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय विकासकामांची शासनाने दिलेली पावती म्हणून पाहिले जात आहे.
अरुण मोकळ यांनी बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) आणि एम.बी.ए.चे उच्च शिक्षण घेतले असून, त्यांच्या तांत्रिक व व्यवस्थापन कौशल्याचा प्रभाव प्रशासनातील निर्णयक्षमतेत सातत्याने दिसून आला आहे.
ते ७ सप्टेंबर २०२१ रोजी देऊळगाव राजा नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी रुजू झाले. नगर परिषदेची मुदत संपल्यानंतर त्यांनी प्रशासक म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. देऊळगाव राजा नगर परिषदेच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावणारे अधिकारी म्हणून त्यांची नोंद झाली आहे.
कार्यकाळात त्यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय साधत शहराच्या विकासासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामे पूर्णत्वास गेली.
शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी रोड) तब्बल ५० वर्षांपासून प्रलंबित असलेले अतिक्रमण कायदेशीर व धाडसी कारवाईद्वारे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. नगरपालिकेच्या शाळांमध्ये सेमी-इंग्लिश माध्यम सुरू करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या.
शहराच्या आपत्कालीन सेवांना अधिक सक्षम करण्यासाठी दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्यात आली. तसेच अरुंद रस्ते व गल्ल्यांमध्ये तत्काळ पोहोचण्यासाठी विशेष ‘बुलेट अग्निशमन मोटारसायकल’ सेवाही सुरू करण्यात आली.
याशिवाय शहरात मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीट रस्ते, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण आणि नवीन पाणीपुरवठा पाइपलाइनची कामे मार्गी लावण्यात आली. त्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली.
सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या कार्यपद्धतीमुळे अरुण मोकळ यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला. सामान्यतः मुख्याधिकाऱ्यांची बदली तीन वर्षांनंतर केली जाते. मात्र, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत शासनाने त्यांची बदली स्थगित करून त्यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ दिली होती. नगरविकास विभागाच्या इतिहासात ही दुर्मिळ बाब मानली जाते.
आता गट-अ (वर्ग-१) पदावर झालेल्या पदोन्नतीमुळे त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला असून, त्यांच्या कार्याचा गौरव होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

