Chandrashekhar Shivacharya Maharaj “गुरुपेक्षा शिष्य कार्यात अग्रेसर राहिला, तर गुरुला आनंदच होतो. शिष्याची प्रगती ही गुरुंसाठी सुख, समाधान आणि समृद्धीची अनुभूती असते,” असे प्रतिपादन जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले.

साखरखेर्ड्यात शिवमहापुराण कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जगद्गुरुंच्या उपस्थितीत ग्रंथ प्रकाशन
साखरखेर्डा : “गुरुपेक्षा शिष्य कार्यात अग्रेसर राहिला, तर गुरुला आनंदच होतो. शिष्याची प्रगती ही गुरुंसाठी सुख, समाधान आणि समृद्धीची अनुभूती असते,” असे प्रतिपादन जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले.
पुरुषोत्तम मासानिमित्त साखरखेर्डा येथे आयोजित शिवमहापुराण कथा व विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. या अधिक मासात शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचे भाग्य साखरखेर्डावासीयांना लाभल्याचे सांगत त्यांनी धार्मिक व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व विशद केले.
दि. २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे आगमन होताच त्यांची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली. श्री पलसिद्ध महास्वामी मठात आगमनानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विचारपीठावर मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी जगद्गुरु श्री पलसिद्ध महास्वामी यांच्या समाधीची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
यानंतर जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, दिगंबर शिवाचार्य महाराज, शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (हदगाव, नांदेड), सदाशिव शिवाचार्य महाराज येळापुरकर, सोमनाथ स्वामी तसेच प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री यांच्या हस्ते ‘मार्ग हा मुक्तीचा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
शिवदीक्षा संस्कार शिबिरात रविवारी शेकडो भक्तांनी शिवदीक्षा घेतली. शिवमहापुराण कथाकार प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री यांनीही सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते लिंगधारण करून शिवदीक्षा स्वीकारली.
यावेळी जगद्गुरु म्हणाले की, शिवदीक्षा कोणीही घेऊ शकतो, त्यासाठी जातीचे कोणतेही बंधन नाही. धार्मिक परंपरेत शिवलिंग धारण करण्याचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी विविध आध्यात्मिक संदर्भ मांडले. “काशीनंतर साखरखेर्डा ही ज्ञानाची नगरी असून धार्मिक व आध्यात्मिक शिक्षणाची गंगोत्री येथे वाहते,” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ज्ञानपरंपरेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या विचारपीठावर विराजमान असलेल्या अनेक संत-महंतांचे प्राथमिक धार्मिक शिक्षण याच मठात झाले असून पुढे त्यांनी काशी येथे अध्ययन केले. सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांची मठाचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाल्याचे सांगत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवमहापुराण कथेसारखा भव्य कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी मठात सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यांची माहिती दिली. दिगंबर शिवाचार्य महाराज, सदाशिव शिवाचार्य महाराज आणि सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनीही आपले विचार व्यक्त केले.
रविवारी सौ. शि. भ. प. ज्योतीताई स्वामी, तर सोमवारी ह. भ. प. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांनी कीर्तनसेवा सादर केली. दुपारी २ ते ५ या वेळेत शिवमहापुराण कथा प्रेममूर्ती जगदीशानंद शास्त्री यांनी कथन केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटवारी महासंघाचे जिल्हा सचिव शिवानंदन वाकदकर यांनी केले.

