Husband and wife commit suicide : तालुक्यातील स्वासीन येथे घरगुती वादातून जगताप दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बुधवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.अमोल किसन जगताप (४०) व सिमा अमोल जगताप (३५) अशी मृतकांची नावे आहेत.

मंगरूळपीर : तालुक्यातील स्वासीन येथे घरगुती वादातून जगताप दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बुधवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.अमोल किसन जगताप (४०) व सिमा अमोल जगताप (३५) अशी मृतकांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसान किसन जगताप यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांचा मुलगा अमोल किसन जगताप (४०) व सुन सिमा अमोल जगताप (३५) हे दोघे दोन मुलांसह स्वतंत्र राहून मजुरीचे काम करीत होते. मंगळवारी संध्याकाळी साधारण सातच्या सुमारास घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर ते घराबाहेर पडले, अशी माहिती अमोलच्या मुलाने कुटुंबीयांना दिली.कुटुंबीय व गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेतला. गावाबाहेरील सहदेव हिसेकर यांच्या गट क्रमांक १८ मधील शेतातील विहिरीजवळ सिमा हिची चप्पल आढळून आल्याने अनहोनीची भीती व्यक्त करण्यात आली. रात्री अंधार असल्यामुळे शोधमोहीम थांबवावी लागली.
बुधवारी सकाळी गावकरी व आपत्ती व्यवस्थापन पथकाने विहिरीत शोध घेतला असता अमोल व सिमा यांचे मृतदेह मिळून आले. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फिर्यादीने तक्रारीत कोणावरही संशय नसल्याचे नमूद केले आहे.या दुर्दैवी घटनेमुळे स्वासीन गावात शोककळा पसरली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

