Hit-and-Run’ Horror : रस्त्याच्या बाजुला बसलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना भरधाव कारने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेलसमोर घडली. अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. गोविंद किसन शेगोकार (वय ६४) आणि विवेक देविदास पायघण (वय ४१) अशी मृतकांची नावे आहेत.

नांदुरा रोडवरील घटना; रस्त्याच्या बाजुला बसलेले असताना कारने दिली धडक
खामगाव : रस्त्याच्या बाजुला बसलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना भरधाव कारने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे नांदुरा रस्त्यावरील एका हॉटेलसमोर घडली. अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. गोविंद किसन शेगोकार (वय ६४) आणि विवेक देविदास पायघण (वय ४१) अशी मृतकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास दोन्ही सुरक्षा रक्षक ड्युटीदरम्यान हॉटेलसमोरील रस्त्याच्या कडेला बसले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारचे नियंत्रण सुटले आणि कार थेट त्यांच्या अंगावर गेली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी भीषण होती की दोघेही काही फूट अंतरावर फेकले गेले. मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. रस्त्यावर रक्ताचे डाग, तुटलेले साहित्य आणि मृतदेहांचे विदारक दृश्य पाहून उपस्थित हादरून गेले. स्थानिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. अपघातानंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी शहरात वाढत्या भरधाव वाहनांच्या प्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रात्रीच्या वेळी वाहतूक नियंत्रण अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी राजेंद्र किसन शेगोकार (रा. तक्षशिला नगर, घाटपुरी) यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ)(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे शेगोकार आणि पायघण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण खामगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

