Revenue Grievance Redressal Camp: लोणार तालुक्यातील बीबी येथे शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.

एकाच छताखाली शासकीय सेवांचा लाभ; बीबीतील महसूल शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रमेश खंडागळे
बीबी : लोणार तालुक्यातील बीबी येथे शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील, नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर, रामप्रसाद डोळे, मयूर ईप्पर, बबन कांबळे, पुरवठा निरीक्षक अधिकारी आरती दांडगे, मंडळ अधिकारी शिवशंकर खरातवाल तसेच ग्राम महसूल अधिकारी यशवंत घरजाळे, सचिन खिल्लारे, निलेश जाधव, शोभा मस्के, नारायण दहातोंडे आदी उपस्थित होते.
याशिवाय मंडळ अधिकारी सुहास जोशी, लक्ष्मण सानप, ग्राम महसूल अधिकारी सुधीर हनवते, किशोर भोळाणे तसेच मंडळातील ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य राजू इंगळे, चिखला येथील सरपंच गणेश काकड, सामाजिक कार्यकर्त्या सविता भांड तसेच किनगाव जट्टू येथील नागरिकांची विशेष उपस्थिती होती. शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत सातबारा उतारे, फेरफार, रहिवासी दाखले, उत्पन्न दाखले तसेच मृत्यू दाखल्यांचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले. महसूल विभागाच्या एकूण १४६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेसाठी ३५ अर्ज स्वीकारण्यात आले, तर भूमी अभिलेख विभागाकडे १९ प्रकरणे दाखल झाली. ग्रामविकास विभागाची ६, पुरवठा विभागाची ४३, महिला व बालविकास विभागाची ३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच आधार केंद्र आणि सेतू विभागामार्फत १३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना करण्यात आलेले रेती पावत्यांचे वितरण होय. शासनाच्या धोरणानुसार १९७ घरकुल लाभार्थी कुटुंबांना प्रति ५ ब्रास प्रमाणे एकूण ९८३ ब्रास रेतीच्या पावत्यांचे वितरण करण्यात आले. रेती पावत्या मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता.
यावेळी उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. तहसीलदार भूषण पाटील यांनीही नागरिकांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.दरम्यान, लोणार तालुक्यातील लोणार, सुलतानपूर, टिटवी, हिरडा आणि बीबी या मंडळांमध्ये यापूर्वीही अशा प्रकारची महसूल समाधान शिबिरे घेण्यात आली असून नागरिकांना आवश्यक दाखले व विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

