Havoc caused : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील 92 पैकी 91 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

११ तालुक्यांमध्ये कोसळधार ; प्रतापराव जाधवांनी घेतला आढावा, पालकमंत्र्यांकडून मदतीची ग्वाही
बुलढाणा : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील 92 पैकी 91 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील 13 पैकी 11 तालुक्यात 100 मिमीच्या वर पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून काही मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली आहे. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे, बुलढाणा ते चिखली मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देत तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी मुख्यालयी उपस्थित राहून गावागावातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे सांगितले. नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांचे तातडीने पंचनामे करावेत तसेच घरांची पडझड झालेल्या नागरिकांच्या नुकसानीचेही त्वरित पंचनामे करून मदत प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
३० आणि ३१ जुलैदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस झाला. जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक २०७.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल नांदुरा १७४.८ मिमी, खामगाव १५२.१ मिमी, शेगाव १३९.७ मिमी, मलकापूर १३७.२ मिमी, संग्रामपूर ११७.८ मिमी, मेहकर १११ मिमी, चिखली १०९.८ मिमी, मोताळा १०६.७ मिमी, बुलढाणा १०४.८ मिमी, लोणार १०० मिमी, सिंदखेडराजा ९८.१ मिमी आणि देऊळगाव राजा ८२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी तब्बल ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी साचल्याने उभी पिके धोक्यात आली असून माती वाहून जाणे, घरांची पडझड आणि रस्त्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनीही जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळांपैकी ९१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याचे सांगत त्यांनी बाधित नागरिकांना शासनाकडून आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली. शेती, घरे आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने महसूल, कृषी, ग्रामविकास, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून पूरपरिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी नदी, नाले, पूरग्रस्त भाग तसेच धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासन व पालकमंत्र्यांनी केले आहे.

