eligible farmers announced : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग आला असून जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४३६ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार असून योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले.

कर्जमुक्तीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे – जिल्हाधिकारी
बुलढाणा : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग आला असून जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४३६ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार असून योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमुक्ती योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका सहकार अधिकारी, कृषी अधिकारी तसेच विविध राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खासगी आणि सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख २७ हजार ६४६ शेतकरी कर्जमुक्ती व प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र आहेत. पहिल्या टप्प्यातील १ लाख १६ हजार ४३६ लाभार्थ्यांपैकी ४९ हजार ४७ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून ६७ हजार ३८९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे लाभात कोणताही विलंब होऊ नये यासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्वरित ई-केवायसी पूर्ण करावी.
योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित बँका, ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कर्ज खात्यास स्वतंत्र क्रमांक देण्यात आला असून त्याआधारे ॲग्रीस्टॅकवर नोंदणी व आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य
गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील रक्कम आणि पोर्टलवरील थकबाकीत तफावत असल्यास पोर्टलवरील रक्कम अंतिम मानली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोर्टलवर दर्शविण्यात आलेली थकबाकी ३१ मार्च २०२६ पर्यंतची असून, १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आकारू नये, अशा सूचना शासनाने सर्व बँकांना दिल्या असून बँकांनी त्यास मान्यता दिली आहे.
आधार प्रमाणीकरणानंतर काय?
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना यशस्वी प्रमाणीकरणाची पावती मिळेल. त्यामध्ये मंजूर झालेल्या कर्जमुक्ती लाभाची रक्कम नमूद असेल. त्यानंतर लाभाची रक्कम संबंधित कर्ज खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाईल आणि कर्जमुक्ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीही संबंधित बँकांकडून करण्यात येणार आहे.
एनपीए खात्यांसाठी ‘हेअर कट’ सवलत
राष्ट्रीयीकृत बँकांमधील अनुत्पादित (एनपीए) कर्जखात्यांसाठी शासनाने विशेष सवलत जाहीर केली आहे. कर्ज एनपीए झालेल्या कालावधीनुसार ३५ टक्क्यांपासून ८५ टक्क्यांपर्यंत तडजोडीची रक्कम मंजूर करण्यात येणार असून त्याचा लाभ राष्ट्रीयीकृत बँकांच्या पात्र कर्जदारांना मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा कर्जाच्या तपशीलाबाबत आक्षेप असेल त्यांनी पोर्टलवर किंवा जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८०२ या हेल्पलाईनवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

