Harassment for dowry : हुंडा आणि वारंवार पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपातून एका २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील बालाजी नगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील रतन श्रीकिसन पागोरे (रा. बारई, ता. मेहकर) यांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट; विवाहितेच्या मृत्यूनंतर पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा
मेहकर : हुंडा आणि वारंवार पैशांची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोपातून एका २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील बालाजी नगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील रतन श्रीकिसन पागोरे (रा. बारई, ता. मेहकर) यांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी गणेश मेरत (वय २६) हिचा विवाह २२ एप्रिल २०२२ रोजी गणेश रामेश्वर मेरत याच्यासोबत झाला होता. लग्नावेळी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व इतर साहित्य देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही चारचाकी वाहनाची मागणी करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानुसार वाहन खरेदीसाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती.
फिर्यादीनुसार, विवाहानंतर वैष्णवीला वारंवार माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. वाहन कर्जाचे हप्ते, नातेवाईकांच्या लग्नासाठी खर्च तसेच इतर कारणांवरून तिचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारणावरून अनेकदा मारहाण झाल्याचे वैष्णवीने आपल्या वडिलांना सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये पतीच्या शेअर मार्केटमधील आर्थिक व्यवहारांवरून वाद झाल्यानंतर वैष्णवीला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यावेळी तिला माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने अनेक बैठका झाल्या. प्रत्येक वेळी त्रास देणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र काही दिवसांनी पुन्हा पैशांसाठी छळ सुरू होत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी वैष्णवीकडे दहा लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली होती. पैसे आणले नाहीत तर आत्महत्या कर, असे सांगून मारहाण करण्यात आल्याचे तिने आपल्या वडिलांना फोनवरून कळविले होते. २३ जून रोजी सकाळी तिने वडिलांशी संपर्क साधून आपल्याला सतत त्रास दिला जात असून आता तो सहन होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच तिच्या आत्महत्येची माहिती नातेवाईकांना मिळाली.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मेहकर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती गणेश रामेश्वर मेरत, सासरे रामेश्वर गुलाबराव मेरत, सासू मीना रामेश्वर मेरत आणि नणंद मोहिनी जाधव (मेरत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे मेहकर परिसरात हळहळ व्यक्त होत असून हुंडा आणि कौटुंबिक छळाच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

