Comrade Shashikala Maurya : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) बुलढाणा जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ. शशिकला मौर्य यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेच्या विस्तारित पदाधिकारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातील अंगणवाडी व बालवाडी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढा तीव्र करणार; कॉ. शशिकला मौर्य यांची ग्वाही
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) बुलढाणा जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ. शशिकला मौर्य यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेच्या विस्तारित पदाधिकारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातील अंगणवाडी व बालवाडी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन ही संघटना अंगणवाडी सेविका, मदतनीस व बालवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत असते. जिल्हा सचिव सुरेखा तळेकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या विस्तृत कार्यकारिणी बैठकीत संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नवीन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत चर्चा होऊन कॉ. शशिकला मौर्य यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव सुरेखा तळेकर होत्या. यावेळी शालिनी अहिर (शेगाव), माया गव्हाळे (शेगाव), अलका राऊत (मेहकर), रेखा मुंडे (सिंदखेड राजा), अंतकला जाधव (सिंदखेड राजा), सिंधू अहिर (बुलढाणा), शालिनी सरकटे (बुलढाणा), सुनिता काळे (देऊळगाव राजा), संगीता केदारे (मेहकर), संगीता ठाकूर (मलकापूर), तुळसा भोपळे (संग्रामपूर), पुष्पा बनकर (लोणार), मीना बोराडे (खामगाव), सुनंदा सुसर व कमल गीते (चिखली) यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना कॉ. शशिकला मौर्य यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सातत्याने सोपविण्यात येणाऱ्या अतिरिक्त शासकीय कामांच्या प्रश्नावर संघटना ठाम भूमिका घेईल, असे सांगितले. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, सेवा अटी, मानधनवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

