Mahabreaking

[breaking_news]

ACB trap :४८ हजारांच्या शासकीय मदतीवर डल्ला; २४ हजारांची लाच मागणारा संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ACB trap : शासनाच्या योजनांमधून निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीवरच डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी तुषार रमेश राणे याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणात विभागातील बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचारी जगन्नाथ तुकाराम भिवटे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ACB trap

‘योजना मंजूर करून दिली, आता मोबदला द्या’; १२ हजारांची लाच स्वीकारताना संरक्षण अधिकारी जेरबंद

बुलढाणा : शासनाच्या योजनांमधून निराधार आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीवरच डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी तुषार रमेश राणे याला १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणात विभागातील बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचारी जगन्नाथ तुकाराम भिवटे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मामेबहिणीला शासनाच्या कांतीज्योती बालसंगोपन योजना आणि विशेष योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने ४८ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली होती. ही मदत मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून तसेच भविष्यातही शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संरक्षण अधिकारी तुषार राणे यांनी तब्बल २४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी २४ जून रोजी महिला व बालविकास विभागाच्या नांदुरा येथील कार्यालयात करण्यात आली. पडताळणीत राणे यांनी २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचेचा पहिला हप्ता म्हणून १२ हजार रुपये स्वीकारण्यास त्यांनी संमती दिली. तसेच कंत्राटी कर्मचारी जगन्नाथ भिवटे याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचेही तपासात समोर आले.

यानंतर २५ जून रोजी जळगाव जामोद येथील तालुका शेतकरी खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या कार्यालयासमोर एसीबीने सापळा रचला. या कारवाईदरम्यान तुषार राणे याला तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी तुषार राणे आणि जगन्नाथ भिवटे यांच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसीबी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चौरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे आणि एसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top