Gastro outbreak : मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे विहिरीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सदर गावात जाऊन उपचार करण्याची सूचना केल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या तत्परतेमुळे रुग्णांना मिळाला दिलासा
मेहकर : मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे विहिरीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सदर गावात जाऊन उपचार करण्याची सूचना केल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागेशवाडी येथे गावातील विहिरीतून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सदर विहिरीतील पाणी दूषित झाल्यामुळे गावातील ४९ पेक्षा जास्त स्त्री-पुरुषांना काल सायंकाळी गॅस्ट्रोची लागण झाली. सदर गंभीर बाबीची माहिती झाल्याबरोबर माजी आमदार संजय रायमुलकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार, त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय बलकार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव साकरशा येथील डॉ. राठोड यांना नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती देऊन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी तात्काळ गावामध्ये पाठवण्याची सूचना केली.
गावकऱ्यांनी सर्व गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव साकरशा येथे उपचारासाठी नेले असून विशेष आरोग्य पथकाकडून उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून नागेशवाडी येथील विहिरीतील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

