Gastro-diarrhea outbreak : मेहकर तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल नागेशवाडी गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रो व डायरियासारख्या गंभीर आजारांची साथ पसरली आहे. गावात शुध्द पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसाठी नागेशवाडी येथील ग्रामस्थांनी शनिवारी थेट घाण पाण्याच्या गटारात उतरून तीव्र आंदोलन छेडले. नागेशवाडी गावातील सुमारे ७० ते ८० नागरिकांना या आजारांची लागण झाल्याने अनेकांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे.

मेहकर : मेहकर तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासीबहुल नागेशवाडी गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रो व डायरियासारख्या गंभीर आजारांची साथ पसरली आहे. गावात शुध्द पाण्याचा पुरवठा करावा या मागणीसाठी नागेशवाडी येथील ग्रामस्थांनी शनिवारी थेट घाण पाण्याच्या गटारात उतरून तीव्र आंदोलन छेडले. नागेशवाडी गावातील सुमारे ७० ते ८० नागरिकांना या आजारांची लागण झाल्याने अनेकांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे.
प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत शनिवारी शेकडो ग्रामस्थांनी थेट घाण पाण्याच्या गटारात उतरून तीव्र आंदोलन छेडले. यावेळी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात येत होत्या. मात्र ग्रामपंचायत आणि संबंधित आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती गंभीर बनली. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता न होणे, गटारातील सांडपाणी विहिरीत मिसळणे, स्वच्छतेचा अभाव आणि आरोग्य यंत्रणेची कथित निष्क्रियता यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत मेहकरचे तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार बोरकर, प्रभारी गटविकास अधिकारी डी. एम. जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे, विस्तार अधिकारी शिवाजी पंडागळे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी नागेशवाडी येथे दाखल झाले.
यावेळी देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिकेत राठोड, वैद्यकीय अधिकारी श्रीमती प्रियंका गवई, मंडळ अधिकारी महादेव गायकवाड, तलाठी जी. ए. उंबरकर, ग्रामविकास अधिकारी शरद वानखेडे आणि सरपंच राजकुमार पाखरे यांनी गावात पाहणी केली. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत समस्यांचा पाढाच वाचला.
तहसीलदार निलेश मडके यांनी गावातील पाणीपुरवठा विहिरीची पाहणी करून ग्रामपंचायत सरपंच व सचिवांना नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच घाटबोरी उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य विभागाला निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी माजी सरपंच गजानन, पत्रकार संतोष चनेवार, सामाजिक कार्यकर्ते अंकुश राठोड, राजू कुसळकर, शंकरगिरी, देवराव नवले, आकाश नवले, विष्णू खिल्लारे, मारोती डाखोरे, ज्ञानदेव धंदळे, श्याम लठाड, राजू मेटागे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

