Black Marketing of Diesel : समृद्धी महामार्गावरील एका पेट्रोल पंपावरून नियमांचे उल्लंघन करून कॅनमध्ये डिझेल विक्री होत असल्याचे आरोप समोर येत असून, हेच डिझेल डोणगाव शहर व परिसरात चढ्या दराने विकले जात असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकारामुळे सुरक्षेचे नियम, महसूल नुकसान आणि पुरवठा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र संबंधित आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

डोणगाव : समृद्धी महामार्गावरील एका पेट्रोल पंपावरून नियमांचे उल्लंघन करून कॅनमध्ये डिझेल विक्री होत असल्याचे आरोप समोर येत असून, हेच डिझेल डोणगाव शहर व परिसरात चढ्या दराने विकले जात असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकारामुळे सुरक्षेचे नियम, महसूल नुकसान आणि पुरवठा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र संबंधित आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पेट्रोल पंपावरून कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल भरून त्याची वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर हे इंधन डोणगाव व परिसरात अधिक दराने विकले जात असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाहनधारक व शेतकऱ्यांना जादा किंमत मोजावी लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
शासकीय नियमांनुसार, इंधन साठवणूक व वाहतुकीसाठी विशिष्ट सुरक्षा नियम लागू असतात. डिझेलसारख्या ज्वलनशील पदार्थाची अनधिकृत साठवणूक अथवा वाहतूक केल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक स्तरावर होत आहे.
पेट्रोल पंपावरील वादाची चर्चा
दरम्यान, १७ मे रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास संबंधित पेट्रोल पंपावर काही व्यक्तींमध्ये वाद किंवा हाणामारी झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही नागरिकांनी रात्रीच्या वेळी बॅरलमध्ये इंधन भरले जात असल्याच्या कथित प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज तपासून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पुरवठा विभाग काय म्हणतो?
या संदर्भात पुरवठा निरीक्षक नवुशकुमार बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व पेट्रोल पंप चालकांची १८ मे रोजी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आवश्यक बाबींची पडताळणी केली जाईल, असे संकेत दिले.
दरम्यान, नागरिकांकडून संबंधित पेट्रोल पंपाची तपासणी, सुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे का याची पडताळणी आणि अवैध विक्रीबाबत तथ्य स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. प्रकरणी संबंधित विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

