underground drainage : शहरातील प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाऱ्या गंगानगर परिसरात भूमिगत गटार योजनेसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न केल्याने पहिल्याच पावसात संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

खडीकरणाऐवजी टाकला मुरूम: गंगानगरातील नागरिकांचे हाल, संताप वाढला
अकोला : शहरातील प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाऱ्या गंगानगर परिसरात भूमिगत गटार योजनेसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न केल्याने पहिल्याच पावसात संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गंगानगरातील खरप रोड, नेकनाम कॉलनी, राजेश्वर ले-आऊट, गोवर्धन प्लॉट तसेच मॉडर्न इंग्लिश स्कूल परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले असून रोजची ये-जा धोकादायक बनली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदण्यात आले; मात्र काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या गंभीर समस्येकडे पाठ फिरवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांमध्ये पाण्याची डबकी साचू लागली आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी पुरेशा नाल्यांची व्यवस्था नसल्याने अनेक नागरिक मोकळ्या प्लॉटचा वापर सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी करीत आहेत. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूमिगत गटार योजना अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून राबविण्यात आलेली ही योजना सध्या शोभेची वस्तू ठरत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ८० एमएम व ४० एमएम गिट्टी टाकून खडीकरण करणे आवश्यक असताना संबंधित ठिकाणी केवळ मुरूम टाकून काम उरकले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. वाहतुकीमुळे हा मुरूम पुन्हा मातीत रूपांतरित होत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होत आहे. गंगानगरातील काही भागांमध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहेत; मात्र अनेक गल्ली-बोळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून साधे खडीकरणही झाले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात दुजाभाव होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या रस्त्यांचे ८० एमएम व ४० एमएम गिट्टीद्वारे तातडीने खडीकरण करावे, अशी मागणी आगाखान पठाण, अकबर कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नईम खान, शेख नसीर गुरुजी, राजीक शाह, करीम ठेकेदार, शेख हाफिजोद्दीन आदी नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

