Mahabreaking

[breaking_news]

Additional Tehsildar :साखरखेर्डा येथे अपर तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या

Additional Tehsildar : जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व प्रभावी करण्याच्या उद्देशाने नवीन कार्यालयांची मुख्यालये व कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २३ जून २०२६ रोजीच्या निर्देशानुसार साखरखेर्डा येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याबाबत नागरिक, संस्था, लोकप्रतिनिधी व इतर संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

Additional Tehsildar

सिंदखेडराजा तालुक्यात प्रशासकीय पुनर्रचना; साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालयाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू

गजानन तिडके

देऊळगाव राजा  : जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व प्रभावी करण्याच्या उद्देशाने नवीन कार्यालयांची मुख्यालये व कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या २३ जून २०२६ रोजीच्या निर्देशानुसार साखरखेर्डा येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याबाबत नागरिक, संस्था, लोकप्रतिनिधी व इतर संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यात सध्या एकूण सात राजस्व मंडळे आहेत. प्रस्तावानुसार साखरखेर्डा हे अपर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय राहणार असून त्याच्या कार्यक्षेत्रात साखरखेर्डा व शेंदुर्जन या दोन राजस्व मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. तर सिंदखेडराजा, सोनोशी, किनगाव राजा, दुसरबीड आणि मलकापूर पांग्रा ही पाच राजस्व मंडळे मूळ तहसील कार्यालय, सिंदखेडराजा यांच्या कार्यक्षेत्रात कायम राहतील. या संदर्भातील जाहिर सूचना उपविभागीय अधिकारी कार्यालय, सिंदखेडराजा, तहसील कार्यालय, सिंदखेडराजा तसेच तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. अपर तहसीलदार कार्यालय, साखरखेर्डा यांच्या निर्मितीबाबत किंवा प्रस्तावित कार्यक्षेत्र निश्चितीबाबत नागरिक अथवा संस्थांना काही आक्षेप, हरकती किंवा सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय महादेव खडसे यांनी केले आहे. सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, म्हणजेच ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी कार्यालय, सिंदखेडराजा येथे सादर करता येणार आहेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती अथवा आक्षेपांचा विचार करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित नागरिक, संस्था व लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपली मते व सूचना वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित; १५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन

जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी तसेच नागरिकांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खामगाव येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कार्यालयाचे मुख्यालय व कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संबंधित नागरिक, संस्था व इतर घटकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी जाहीर सूचनेद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ही प्रक्रिया हाती घेतली आहे. प्रस्तावित रचनेनुसार अपर जिल्हाधिकारी कार्यालय, खामगाव यांच्या कार्यक्षेत्रात खामगाव, शेगाव, मोताळा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद या सात तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तर मूळ अपर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या कार्यक्षेत्रात बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर आणि लोणार हे सहा तालुके राहतील. या नवीन प्रशासकीय रचनेमुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांचे विकेंद्रीकरण अधिक प्रभावीपणे होऊन प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीबाबत अथवा कार्यक्षेत्र निश्चितीबाबत कोणत्याही नागरिक, संस्था किंवा संबंधित घटकांना काही आक्षेप, हरकती किंवा सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, म्हणजेच ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा आक्षेपांचा विचार करण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित नागरिक, संस्था, लोकप्रतिनिधी व विविध घटकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपली मते आणि सूचना वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top