Focus on Namaz : मोहरम महिन्याच्या पवित्र दिवसांच्या पार्श्वभूमीवर जमीयत उलेमा शहर बाळापूरचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद इस्माईल अशाअती यांनी बाळापूर शहर व परिसरातील सर्व नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ९, १०, ११ व १२ मोहरमच्या दिवसांत हजरत इमाम हुसेन (र.अ.) आणि शहीद-ए-कर्बला यांच्या शिकवणींवर आचरण करण्याचे आवाहन केले आहे.

शहीद-ए-कर्बला यांचे बलिदान सत्य आणि मानवतेचा संदेश देणारे : मौलाना अशाअती
बाळापूर : मोहरम महिन्याच्या पवित्र दिवसांच्या पार्श्वभूमीवर जमीयत उलेमा शहर बाळापूरचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद इस्माईल अशाअती यांनी बाळापूर शहर व परिसरातील सर्व नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ९, १०, ११ व १२ मोहरमच्या दिवसांत हजरत इमाम हुसेन (र.अ.) आणि शहीद-ए-कर्बला यांच्या शिकवणींवर आचरण करण्याचे आवाहन केले आहे.

मौलाना अशाअती यांनी सांगितले की, इमाम हुसेन (र.अ.) यांचे बलिदान सत्य, न्याय, मानवता, इस्लाम धर्माचा प्रसार आणि पैगंबर हजरत मुहम्मद (स.अ.व.) यांच्या सुन्नतींवर चालण्याचा संदेश देते. या पवित्र दिवसांत पाच वेळच्या नमाजची नियमितपणे अदा करणे, कुरआनचे पठण करणे, मशिदींशी नाते दृढ करणे, दीनचे योग्य ज्ञान प्राप्त करणे आणि समाजसेवा करणे आवश्यक आहे.
त्यांनी इमाम हुसेन (र.अ.) यांच्या नावावर होणाऱ्या अंधश्रद्धा, बिदअत, चुकीच्या प्रथा, फाजील खर्च आणि निरर्थक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी उलेमा-ए-किराम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची सुधारणा करण्यासह समाजसुधारणेचे कार्य करण्यावर भर दिला.
पालकांनी आपल्या मुलांमध्ये हजरत इमाम हसन (र.अ.) व हजरत इमाम हुसेन (र.अ.) यांचे आदर्श गुण विकसित करावेत. मातांनी हजरत फातिमा झहरा (र.अ.) यांच्या आणि वडिलांनी हजरत अली (र.अ.) यांच्या गुणांचे अनुकरण करून सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि शिक्षित पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

जमीयत उलेमा शहर बाळापूरने नागरिकांना आवाहन केले आहे की, समाजातील नकारात्मक वातावरणामुळे स्वतः बदलण्याऐवजी समाजाला सकारात्मक दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करावेत. शहीद-ए-कर्बला यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात उतरविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही आवाहन करण्यात आले आहे.

