Fraud : बनावट लग्न करून एका व्यक्तीकडून तब्बल चार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी उरळ पोलिसांनी महिला आरोपीसह तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे. या प्रकरणातील महिला आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, तिच्या साथीदाराला २२ ऑगस्ट रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे बनावट विवाहाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

लग्नाच्या आमिषाने चार लाखांचा गंडा; महिला आरोपीसह साथीदाराला अटक
उरळ : बनावट लग्न करून एका व्यक्तीकडून तब्बल चार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी उरळ पोलिसांनी महिला आरोपीसह तिच्या एका साथीदाराला अटक केली आहे. या प्रकरणातील महिला आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, तिच्या साथीदाराला २२ ऑगस्ट रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे बनावट विवाहाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
या प्रकरणी भाउसाहेब मच्छिद्र बनसोडे (वय ३५, व्यवसाय मजुरी, रा. अखानी, पोस्ट खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून उरळ पोलीस ठाण्यात अप. क्र. २९८/२०२६, कलम ३१८(४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील महिला आरोपी शिल्पा मिलिंद अहिर (वय ३०, रा. तारफेल, जि. अकोला) हिने फिर्यादीसोबत बनावट लग्न केले. त्यानंतर महिला आरोपी आणि तिच्या साथीदारांनी संगनमत करून फिर्यादीकडून चार लाख रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान उरळ पोलिसांनी महिला आरोपी शिल्पा अहिर हिला २१ ऑगस्ट २०२६ रोजी अटक केली. त्यानंतर तिचा साथीदार आरोपी विनायक किसनराव गवई (वय ५६, रा. ग्राम खांबोरा, ता. जि. अकोला) याला २२ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उरळचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, सफौ राजू जोंधरकर, पोलीस हवालदार विजय चव्हाण, रघुनाथ नेमाडे, पोलीस कॉन्स्टेबल विकास राठोड, उमेश वाकोडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुक्मिणी घोडके आणि पल्लवी काळे यांच्या पथकाने केली.

