marriage certificate : विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असल्याने गैरसोय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही खर्च करावे लागत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी विवाह प्रमाणपत्राची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याची मागणी आम आदमी पार्टी, बाळापूर शहराच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

विवाह प्रमाणपत्राची धावपळ थांबवा; ऑनलाइन सुविधेसाठी आम आदमी पार्टीचे निवेदन
बाळापूर : विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असल्याने गैरसोय होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही खर्च करावे लागत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी विवाह प्रमाणपत्राची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याची मागणी आम आदमी पार्टी, बाळापूर शहराच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापासून कागदपत्रे सादर करणे, अर्जाची स्थिती तपासणे आणि प्रमाणपत्र मिळविण्यापर्यंत नागरिकांना विविध टप्प्यांवर संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते. त्यामुळे कामधंदा सोडून नागरिकांना शासकीय कार्यालयात वेळ घालवावा लागतो. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची यामुळे विशेषतः मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डिजिटल युगात शासकीय सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याची गरज असताना विवाह प्रमाणपत्राची प्रक्रिया अद्याप नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सादर करण्याची, अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन तपासण्याची आणि प्रमाणपत्रही डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यास नागरिकांची कार्यालयीन धावपळ कमी होण्यासोबतच प्रवासाचा वेळ व खर्च वाचणार आहे. तसेच अर्जांच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढून प्रशासनावरील कामाचा ताणही कमी होण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन विवाह प्रमाणपत्राची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टी, बाळापूर शहराच्या वतीने करण्यात आली आहे.

