Flag-hoisting : देशाच्या रक्षणासाठी सैन्यात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान व्हावा, या उद्देशाने साखरखेर्डा येथे यंदा २४ शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांच्या आवाहनाला गावातील विविध संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

देशसेवकांच्या सन्मानासाठी अभिनव उपक्रम; साखरखेर्ड्यात माजी सैनिकांना ध्वजारोहणाचा मान
साखरखेर्डा : देशाच्या रक्षणासाठी सैन्यात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान व्हावा, या उद्देशाने साखरखेर्डा येथे यंदा २४ शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांच्या आवाहनाला गावातील विविध संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
देशाच्या सीमेचे रक्षण करताना भारतीय सैनिक जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावतात. साखरखेर्डा येथील अनेक सैनिकांनी कारगिल युद्धासह चीन युद्धातही सहभाग घेत देशसेवा केली आहे. सैन्यात दाखल होणारा युवक अनेकदा शेतकरी कुटुंबातून किंवा रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्य कुटुंबातून आलेला असतो. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या या सैनिकांच्या योगदानाचा स्वातंत्र्यदिनी गौरव व्हावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन प्रत्येक शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थेत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार संबंधित संस्थांना विनंतीपत्र देण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
ग्रामपंचायत कार्यालयावर सेवानिवृत्त लष्कर अधिकारी लिंबाजी जाधव आणि सुधाकर राजगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल, मंगलसिंग राजपूत, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विविध संस्थांमध्ये माजी सैनिकांचा गौरव
जिजामाता विद्यालयात माजी विद्यार्थी म्हणून लिंबाजी जाधव यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव पंजाबराव हाडे, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एस.ई.एस. हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेजमध्येही त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय उपडाकघर (पोस्ट ऑफिस) येथे माजी सैनिक अंबादास सुखदाने, श्री शिवाजी हायस्कूलमध्ये माजी सैनिक राहूल गवई, तर अनिकेत सैनिक स्कूलमध्ये माजी सैनिक अर्जुन गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच श्री पलसिद्ध प्राथमिक शाळा, मंडळाधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, सहकार विद्या मंदिर, अण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद ऊर्दू उच्च प्राथमिक शाळा, ऊर्दू हायस्कूल, भारतीय स्टेट बँक, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, पोलीस स्टेशन यासह विविध ठिकाणी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी माजी सैनिक विलास गवई, राम दानवे, डिगांबर खरात, सखाराम खरात यांनाही ध्वजारोहणाचा मान मिळाला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव चंद्रशेखर शुक्ल, श्री शिवाजी हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. निलम महाजन, ठाणेदार युवराज रबडे, माजी सरपंच कमलाकर गवई, दाऊद कुरेशी, महेंद्र पाटील, सुनिल जगताप, माजी उपसरपंच सय्यद रफीक, इब्राहिम शहा, गणपत अवचार, आयुब कुरेशी, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, केंद्रप्रमुख संतोष सरकटे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, लखन राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी अमित जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून देशसेवकांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

