Electrocution : सिनगाव येथून वानेगावकडे घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत वितरणाच्या डीपीच्या वायरचा विजेचा धक्का लागून ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री सिनगाव शिवारात घडली. या घटनेमुळे वानेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डीपीच्या उघड्या वायरचा जीवघेणा धक्का; वानेगावच्या राजेंद्र कुहीरे यांचा मृत्यू
देऊळगाव राजा : सिनगाव येथून वानेगावकडे घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत वितरणाच्या डीपीच्या वायरचा विजेचा धक्का लागून ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री सिनगाव शिवारात घडली. या घटनेमुळे वानेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजेंद्र साहेबराव कुहीरे (वय ४२, रा. वानेगाव, ता. देऊळगाव राजा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ योगेश साहेबराव कुहीरे (वय ३०) यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दिलेल्या तोंडी अहवालावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कुहीरे हे १३ ऑगस्ट रोजी रात्री सिनगाव येथून वानेगाव येथे आपल्या घरी येत होते. रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास सिनगाव-वानेगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत डीपीच्या वायरचा त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर याबाबत देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजून २१ मिनिटांनी मर्ग क्रमांक ३२/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने बीट पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या घटनेमुळे सिनगाव-वानेगाव मार्गावरील विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रस्त्यालगत असलेल्या विद्युत वाहिन्या व डीपीची सुरक्षितता तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.

