Farmer from Dagadwadi : तालुक्यातील दगडवाडी येथे घरामागील भिंतीवरून पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, डोक्याला व मानेस गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला असून, नेमक्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

घरामागील बोळीत आढळला शेतकरी मृतावस्थेत; देऊळगाव राजा पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील दगडवाडी येथे घरामागील भिंतीवरून पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, डोक्याला व मानेस गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला असून, नेमक्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक नंदाजी दुर्योधन घुगे (वय ४७, रा. दगडवाडी, ता. देऊळगाव राजा) हे गुरुवार, २३ जुलै रोजी दिवसभर घरी होते. संध्याकाळी ते घरी आले होते. रात्री सुमारे ९ वाजेपर्यंत ते घरीच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर सर्वजण जेवण करून झोपले.
शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी सुमारे ७ वाजता शेजारी योगेश शिवाजी घुगे हे घराबाहेर आले असता घराच्या पाठीमागील बोळीत नंदाजी घुगे हे पडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता नंदाजी घुगे कोणताही प्रतिसाद देत नव्हते. त्यानंतर तातडीने ११२ आपत्कालीन सेवेला संपर्क साधण्यात आला.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी नंदाजी घुगे यांना शासकीय रुग्णालय, देऊळगाव राजा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
मृताचे जुळे बंधू सुभाष दुर्योधन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदाजी घुगे हे घराच्या मागील भिंतीवर चढले असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली डोक्यावर पडले असावेत. त्यामुळे त्यांच्या मानेस व डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (मर्ग) क्रमांक ३०/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंदविण्यात आला आहे. घटनेची नोंद सहायक पोलिस उपनिरीक्षक निलीमा जाधव यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत.
दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

