Farm dispute escalates : तालुक्यातील आळंद येथील शेतशिवारात शेताच्या हद्दीवरील वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. एका फिर्यादीत कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून, दुसऱ्या फिर्यादीत खुरप्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परस्परविरोधी तक्रारींवरून देऊळगाव राजा पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

दगड, कपाशीच्या पिकावरून वाद अन् हाणामारी; कुऱ्हाड व खुरप्याने हल्ल्याचे आरोप
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील आळंद येथील शेतशिवारात शेताच्या हद्दीवरील वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. एका फिर्यादीत कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून, दुसऱ्या फिर्यादीत खुरप्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परस्परविरोधी तक्रारींवरून देऊळगाव राजा पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
पहिल्या प्रकरणात आळंद येथील सुधाकर लिंबाजी खार्डे (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जुलै रोजी दुपारी सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान ते आपल्या शेतात गेले असता शेतात दगडांचे ढिगारे टाकलेले दिसले. याबाबत त्यांनी सारंगधर (सारंग) दशरथ खार्डे याच्याकडे विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान सारंगधर खार्डे याने कुऱ्हाडीने डाव्या पायाच्या नळीवर वार करून जखमी केले तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याच घटनेप्रकरणी सारंगधर दशरथ खार्डे (वय ३०) यांनीही दुसऱ्या दिवशी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, शेतातील कपाशीचे पीक का उपटले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून सुधाकर लिंबाजी खार्डे यांनी शिवीगाळ करत हातातील धारदार खुरप्याने दोन्ही पाय, हात तसेच डाव्या बाजूच्या छातीवर वार केले. तसेच खुरप्याच्या दांड्याने पाठीवर मारहाण करून जखमी केले आणि भविष्यात शेतात एकटे आढळल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ दाखल करण्यात आला असून, त्यातही BNS कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३) व ३५२ लागू करण्यात आले आहेत.
पहिल्या गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल चमकुरे यांनी केली असून, दुसऱ्या गुन्ह्याची नोंद सहायक फौजदार निलीमा जाधव यांनी केली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे करीत आहेत.
या घटनेमुळे आळंद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली असून, घटनास्थळावरील परिस्थिती, वैद्यकीय अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे नेमका प्रकार काय घडला, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

