Excise Department : पुणे जिल्ह्यात मिथेनॉलमिश्रित विषारी दारू सेवनामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुलढाणा जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेत मोठी कारवाई केली आहे. २९ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल ११० गुन्हे नोंदविण्यात आले असून १०८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ९ वाहने जप्त करून १४ लाख ६८ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विषारी दारू दुर्घटनेनंतर बुलढाण्यात मोठी कारवाई; १४.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा : पुणे जिल्ह्यात मिथेनॉलमिश्रित विषारी दारू सेवनामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुलढाणा जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेत मोठी कारवाई केली आहे. २९ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल ११० गुन्हे नोंदविण्यात आले असून १०८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ९ वाहने जप्त करून १४ लाख ६८ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बुलढाणा, देऊळगाव राजा, खामगाव तसेच भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध भागांत एकाचवेळी धडक कारवाया केल्या. भिलवाडा, डोंगरखंडाळा, सुंदरखेड, बोराखेडी, मातला, बोरी आडगाव, देवघाबा, उंबरखेड शिवार, कोलवड, रणथम, जामोद, सुनगाव, गवळीपूरा, शहापूर, मानसगाव, शिरोळा, खामखेड आणि कवठळ परिसरातील हातभट्ट्या तसेच अवैध मद्यविक्रीच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले.
ही मोहीम राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. बुलढाणा जिल्ह्याचे अधीक्षक चारुदत्त हांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाईचे नियोजन करून अवैध मद्यव्यवसायाला मोठा धक्का दिला.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विना परवाना मद्यविक्री, अल्पवयीनांना मद्य उपलब्ध करून देणे अथवा निर्धारित वेळेच्या बाहेर मद्यविक्री केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे.
अवैध मद्यनिर्मिती आणि हातभट्ट्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने या प्रकारांविरोधात जनसहभागाचीही गरज असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अवैध मद्यविक्री, हातभट्टी, हॉटेल-धाब्यांमधील बेकायदेशीर मद्यव्यवहार किंवा वाहतुकीबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 18002339999, व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 तसेच ऑनलाइन तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी निर्मूलनासाठी जिल्ह्यातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येतील,” असा निर्धार राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केला आहे.

