Risaldar Major Limbaji Jadhav: “भारतीय सैन्यात २८ वर्षे सेवा बजावताना कारगिल युद्धापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत प्रत्येक मोहिमेत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. सैन्यातून नियमानुसार सेवानिवृत्त झालो असलो, तरी देशसेवा हेच माझे कर्तव्य राहील,” असे भावनिक प्रतिपादन भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले रिसालदार मेजर लिंबाजी जाधव यांनी केले.

२८ वर्षांच्या गौरवशाली सैन्य सेवेनंतर मायभूमीत जल्लोषात स्वागत; साखरखेर्ड्यात माजी सैनिकांचा अभिमान
साखरखेर्डा : “भारतीय सैन्यात २८ वर्षे सेवा बजावताना कारगिल युद्धापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत प्रत्येक मोहिमेत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. सैन्यातून नियमानुसार सेवानिवृत्त झालो असलो, तरी देशसेवा हेच माझे कर्तव्य राहील,” असे भावनिक प्रतिपादन भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले रिसालदार मेजर लिंबाजी जाधव यांनी केले.
भारतीय सैन्यदलात तब्बल २८ वर्षे २३ दिवस गौरवशाली सेवा बजावून ३१ जुलै रोजी मायभूमीत परतलेल्या लिंबाजी जाधव यांचे साखरखेर्डा येथे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. श्री पलसिद्ध महास्वामी मठात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
१९९८ मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश, चीन तसेच अफगाणिस्तान सीमावर्ती भागात विविध जबाबदाऱ्या सांभाळत देशसेवा केली. जून १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या लष्करी कारवाईतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
सन २०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांनी ४८ राष्ट्रीय रायफल्समध्ये राजौरी व मेंढर सेक्टरमध्ये सेवा बजावली. तसेच २०२५ मध्ये भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान अमृतसर सीमेवर एका बटालियन कंपनीचे वरिष्ठ जेसीओ (Junior Commissioned Officer) म्हणून नेतृत्व केले.
साखरखेर्ड्यात आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज टी-पॉइंट येथे फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या जीपमधून त्यांची सहकुटुंब गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, सरपंच ज्योती अमित जाधव, माजी सैनिक देवलाल कव्हळे, अर्जुन गवई, विजय पांचाळ, सुनील रिंढे, रमेश दंदाळे, गजानन पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अनिकेत सैनिक स्कूलचे विद्यार्थी तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.
लिंबाजी जाधव यांचा जन्म अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण जिजामाता विद्यालयात झाले. सैन्यात भरती होण्यापूर्वी त्यांनी १९९५ ते १९९७ या कालावधीत आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून बुलढाणा येथे मोटार मेकॅनिक म्हणूनही काम केले.
कार्यक्रमात त्रिदल माजी सैनिक सेवा संघाचे पदाधिकारी, सेवानिवृत्त सैनिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून लिंबाजी जाधव यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या गौरवशाली सेवेमुळे साखरखेर्ड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

