National Bar: स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकाजवळ असलेल्या ‘नॅशनल बार’ मध्ये सुरू असलेल्या हार-जीतच्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख ७ हजार २०० रुपये आणि ५२ ताशपत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नॅशनल बारमध्ये रंगला हार-जीतचा जुगार; रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
डोणगाव : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकाजवळ असलेल्या ‘नॅशनल बार’ मध्ये सुरू असलेल्या हार-जीतच्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख ७ हजार २०० रुपये आणि ५२ ताशपत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४० वाजता नॅशनल बारमध्ये काहीजण अवैधपणे पत्त्यांवर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांना मिळाली होती. त्यानुसार पंचांच्या उपस्थितीत तातडीने छापा टाकण्यात आला.
या कारवाईत शेरू अली युसुफ अली, शेख रफीक शेख महंमद, शेख अकबर शेख मदन, हुसेन शहा चांद शहा, सलीम खाँ खाँजा खाँ, गनी शहा लतीफ शहा आणि युसुफ खान दिलदार खान (सर्व रा. डोणगाव) हे हार-जीतचा जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीत तसेच जुगाराच्या डावावरून ७ हजार २०० रुपये रोख रक्कम आणि ५२ ताशपत्ते जप्त केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय घिके यांनी केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, डोणगाव परिसरात अवैध धंदे, बनावट मद्यविक्री तसेच मोबाईलद्वारे चालणाऱ्या सट्टा-जुगाराच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अशा अवैध धंद्यांविरोधातही पोलिसांनी सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

