Theft of iron rods : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या एका बांधकामस्थळावरून तब्बल ४२ हजार ५२७ रुपयांचे लोखंडी गज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात चोरट्यांचा हातसाफ; बांधकाम साहित्य लंपास
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या एका बांधकामस्थळावरून तब्बल ४२ हजार ५२७ रुपयांचे लोखंडी गज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष अशोक लोहिया (वय ४३, रा. सिव्हिल कॉलनी, देऊळगाव राजा) यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला बांधकाम सुरू आहे. २८ जुलै रोजी रात्री ९ ते २९ जुलै रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बांधकामस्थळावरून लोखंडी गजांची चोरी केली.
चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये ८ मिमीचे ६ लोखंडी गज (३६० किलो) किंमत १८,५४० रुपये, १२ मिमीचे ५ लोखंडी गज (३१० किलो) किंमत १५,६५५ रुपये आणि १६ मिमीचे ३ लोखंडी गज (१६५ किलो) किंमत ८,३३२ रुपये असा एकूण ४२,५२७ रुपयांचा माल असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून १ ऑगस्ट रोजी पहाटे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची पाहणी पोलीस अधिकाऱ्यांनी केली असून पंचनामा करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

