Erratic power supply : साखरखेर्डा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी थेट मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त असून, रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून निष्काळजी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘कागदोपत्री कामे, जनतेला अंधार’; अंकुर देशपांडे यांचे महावितरण प्रशासनावर गंभीर आरोप
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुर देशपांडे यांनी थेट मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त असून, रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून निष्काळजी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
साखरखेर्डा ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत तब्बल ५२ गावांचा वीजपुरवठा येतो. या परिसरात अल्प पाऊस किंवा साधा वारा आला तरी वीजपुरवठा खंडित होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्या, फिडर, डीपी, ट्रान्सफॉर्मर, वायरिंग व अन्य यंत्रणांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती अपेक्षित असताना संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.
पत्रात त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, काही अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतातून प्रत्यक्षात कामे न करता किंवा अपूर्ण कामे करून देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात आहे. त्यामुळे लाखो रुपयांची बिले काढली जात असून शासन निधीचा अपव्यय होत आहे. परिणामी नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे.
वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीची कामे, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच २०२० पासून उपकेंद्रांतर्गत झालेल्या सर्व देखभाल व दुरुस्ती कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले यांच्यामार्फत सादर करण्यात आले. महाले यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत संबंधित अधीक्षक अभियंत्यांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.या पत्रामुळे साखरखेर्डा परिसरातील वीजप्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय ठरला असून, महावितरण प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

