Monkey Injured : येथील पोलीस स्टेशन परिसरात मागील तीन दिवसांपासून जखमी अवस्थेत वावरत असलेल्या एका वानराची यशस्वी सुटका करण्यात आली. विजेचा धक्का लागल्यामुळे वानराच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली होती. पोलीस, वन विभाग आणि वन्यजीव रक्षकांच्या समन्वयातून ही रेस्क्यू मोहीम यशस्वी पार पडली.

तीन दिवसांपासून जखमी अवस्थेत वावरत असलेल्या वानराला सुरक्षित उपचारासाठी हलविले
देऊळगाव राजा : येथील पोलीस स्टेशन परिसरात मागील तीन दिवसांपासून जखमी अवस्थेत वावरत असलेल्या एका वानराची यशस्वी सुटका करण्यात आली. विजेचा धक्का लागल्यामुळे वानराच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली होती. पोलीस, वन विभाग आणि वन्यजीव रक्षकांच्या समन्वयातून ही रेस्क्यू मोहीम यशस्वी पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन परिसरात जखमी वानर इकडून-तिकडे भटकताना दिसत होते. विजेच्या शॉकमुळे त्याच्या एका हाताला गंभीर इजा झाली असल्याचे प्राथमिक निरीक्षणात दिसून आले. वानराची अवस्था लक्षात घेत पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला.
वन विभागाने युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाचे वन्यजीव रक्षक वैभव लाखोले यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वन विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
सुरुवातीला जखमी वानराला पकडण्याचा प्रयत्न काहीसा कठीण ठरला. जखमी असूनही वानर चपळाईने हालचाल करत असल्याने रेस्क्यू मोहिमेत अडथळे निर्माण झाले. मात्र, वन्यजीव रक्षक वैभव लाखोले यांनी संयम आणि कौशल्य दाखवत अखेर वानराला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवले.
त्यानंतर जखमी वानराला तातडीने जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. वानर पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला वन विभागाच्या देखरेखीखाली ठेवावे आणि प्रकृती सुधारल्यानंतरच नैसर्गिक अधिवासात सोडावे, अशी मागणी वैभव लाखोले यांनी केली. दि. २८ मे रोजी पार पडलेल्या या रेस्क्यू मोहिमेमुळे एका जखमी वन्यजीवाला वेळेत मदत मिळाली असून पोलीस प्रशासन, वन विभाग आणि स्वयंसेवी वन्यजीव रक्षकांच्या समन्वयाचे परिसरात कौतुक होत आहे.

