Effectively utilize : ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती देणे, ग्रामपंचायतींची आर्थिक क्षमता वाढविणे आणि पारदर्शक प्रशासनाला चालना देणे या उद्देशाने १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा बाळापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्ततेची नवी संधी; बाळापूरात विशेष प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
बाळापूर : ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती देणे, ग्रामपंचायतींची आर्थिक क्षमता वाढविणे आणि पारदर्शक प्रशासनाला चालना देणे या उद्देशाने १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा बाळापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

हॉटेल मराठा येथे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी ग्रामविकासाच्या नव्या संकल्पना, निधी नियोजन, डिजिटल प्रशासन आणि शाश्वत विकासाच्या धोरणांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षक सुधीर सरकटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, १६ व्या वित्त आयोगाच्या नव्या तरतुदींमुळे ग्रामपंचायतींना अधिक आर्थिक स्वायत्तता आणि विकासासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. निधीचा नियोजनबद्ध व पारदर्शक वापर, ग्रामपंचायत विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी आणि डिजिटल प्रणालींचा अवलंब केल्यास ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलू शकतो. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा योग्य विनियोग करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षक रोहिदास भोयर यांनी शाश्वत विकास ध्येय (SDG) या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करताना आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण संवर्धन या विषयांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. उपलब्ध निधीचा लोकहितासाठी प्रभावी वापर करून ग्रामविकासाची प्रक्रिया अधिक परिणामकारक कशी करता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP) तयार करण्याची प्रक्रिया, ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरणे, निधी नियोजन, खर्चाचे व्यवस्थापन, लेखापरीक्षण आणि विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. त्यामुळे उपस्थित सरपंच व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजात उपयोगी पडणारे मार्गदर्शन मिळाले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बांगर, गटविकास अधिकारी नाना पजई, सहाय्यक प्रशासन अधिकारी विनोद काळे, विस्तार अधिकारी दिग्विजय चव्हाण आणि गंगाधर गुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.
प्रशिक्षक रोहिदास भोयर, गणेश पोटे, सुधीर सरकटे आणि संतोष चक्रनारायण यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सरकटे यांनी केले, तर तालुका समन्वयक नाना गवई यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळून आभार प्रदर्शन केले.
ग्रामपंचायत प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त करत प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. या कार्यशाळेमुळे ग्रामपंचायतींना नवीन वित्तीय धोरणांची अंमलबजावणी करताना मोठी मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

