Drip irrigation pipes :चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस बू परिसरात अज्ञात व्यक्तीकडून शेतातील ठिबक सिंचनाच्या पाईपची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.

चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस बू येथील घटना
राहुल सोनोने
दिग्रस बू : चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस बू परिसरात अज्ञात व्यक्तीकडून शेतातील ठिबक सिंचनाच्या पाईपची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस बू ते चान्नी मार्गालगत असलेल्या शेतकरी संदीप गावंडे यांच्या गट क्रमांक २९१ मधील शेतात लिंबू बाग लागवड करण्यात आली आहे. बागेला ठिबक सिंचनाद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, १७ जूनच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी ठिबक सिंचनाच्या पाईपची तोडफोड करून ते कापल्याचे आढळून आले.
सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ठिबक पाईप कापल्यामुळे सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली असून बागेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
परिसरात यापूर्वीही चोरी व तोडफोडीच्या घटना घडल्याच्या चर्चा असून, त्यामुळे शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अज्ञात व्यक्तींनी हेतुपुरस्सर ही तोडफोड केली की इतर कोणते कारण आहे, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.
शेतकरी संदीप गावंडे तसेच स्थानिक नागरिकांनी चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार व बीट जमादार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शेतशिवार परिसरात रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, अशीही मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींना जेरबंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

