Drains blocked : रायपूर–पाचला गावजोड रस्त्याच्या कामातील कथित निष्काळजीपणा आणि संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे हिवरा आश्रम परिसरातील १० ते १५ शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या नाल्या माती व दगड टाकून बंद करण्यात आल्याने शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून, नुकतीच केलेली पेरणी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अधिकाऱ्यांच्या दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना; नुकसानभरपाईसह कारवाईची मागणी
हिवरा आश्रम : रायपूर–पाचला गावजोड रस्त्याच्या कामातील कथित निष्काळजीपणा आणि संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे हिवरा आश्रम परिसरातील १० ते १५ शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या नाल्या माती व दगड टाकून बंद करण्यात आल्याने शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून, नुकतीच केलेली पेरणी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सन २०२५ मध्ये सुरू झालेल्या रायपूर–पाचला गावजोड रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, रस्त्यालगतच्या नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्याचा मार्ग बंद झाल्याने पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये साचत आहे. परिणामी अनेक एकर शेती जलमय झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी मागील वर्षी निवासी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी संयुक्त पाहणी करून वहिवाटीने पाणी वाहून जाण्यासाठी क्रॉसिंग पाईप टाकण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार पाईप टाकण्यातही आले होते. मात्र, मे २०२६ मध्ये काही व्यक्तींनी ते पाईप दगड व माती टाकून पुन्हा बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या गंभीर प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करून नाली खुली करण्याची मागणी केली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी तातडीने पाण्याचा निचरा करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “जर तातडीने न्याय मिळाला नाही, तर आत्मदहनाशिवाय पर्याय उरणार नाही,” असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

