Mahabreaking

[breaking_news]

Dr. Rajendra Shingne: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे आघाडीवर; ‘सहकार’मध्ये हालचालींना वेग!

Dr. Rajendra Shingne: तब्बल १८ वर्षे प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची सूत्रे आता लोकनियुक्त संचालक मंडळाच्या हाती येणार आहेत. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या सभागृहात होणार आहे. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव सध्या आघाडीवर असून, ‘सहकार’ पॅनलमध्ये या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Dr. Rajendra Shingne

 २१ पैकी १९ संचालक ‘सहकार’च्या गोटात; जिल्हा बँकेच्या सत्तेवर शिंगणेंचे वर्चस्व?

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : तब्बल १८ वर्षे प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची सूत्रे आता लोकनियुक्त संचालक मंडळाच्या हाती येणार आहेत. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या सभागृहात होणार आहे. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव सध्या आघाडीवर असून, ‘सहकार’ पॅनलमध्ये या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‘सहकार’ पॅनलने २१ पैकी १९ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे अध्यक्षपदही ‘सहकार’ पॅनलकडे जाण्याची शक्यता बळावली आहे. सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संचालकांमधील प्रभाव आणि प्रशासकीय कामकाजाची जाण या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे.

१८ वर्षांनंतर बँकेची सूत्रे लोकप्रतिनिधींच्या हाती

जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या इतिहासात तब्बल १८ वर्षांनंतर निवडणुकीच्या माध्यमातून संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यामुळे नव्या संचालक मंडळाच्या स्वागतासाठी बँकेची मुख्य इमारत आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली आहे. इमारतीची अंतर्गत तसेच बाह्य रंगरंगोटी करण्यात आली असून, बँक परिसरात नव्या संचालकांच्या आगमनाबाबत उत्साहाचे वातावरण आहे.

मागील दीर्घ काळ बँक प्रशासकांच्या ताब्यात होती. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आणि आर्थिक अडचणींमुळे बँकेसमोर मोठी आव्हाने निर्माण झाली होती. या काळात प्रशासकीय अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्याचे सांगितले जाते. आता निवडून आलेल्या संचालक मंडळासमोर बँकेचा आर्थिक कारभार अधिक सक्षम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

२१ जागांपैकी १२ बिनविरोध; ‘सहकार’चा वरचष्मा

जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत सुरुवातीला १२ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित नऊ जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष मतदानात ‘छत्री’ या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या सहकार पॅनलने सात जागांवर विजय मिळविला. तर ‘ट्रॅक्टर’ चिन्हावर मैदानात उतरलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये सुनील राजाराम उदयकर, गोविंदराव गणपत मिरगे, श्रीकांत दादाराव मारोडे, पुष्पाबाई बारवकर, अस्मिता प्रदीप हेलगे, संजय भास्करराव रायमूलकर आणि गोविंद शेषराव मापारी यांचा समावेश आहे. तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे हे विजयी झाले.

शिंगणे-जाधव नेतृत्वावर मतदारांची मोहर?

या निवडणुकीत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दिल्याचा दावा ‘सहकार’ गोटातून करण्यात येत आहे. जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा पुढे करीत विरोधकांनी राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालाने ‘सहकार’ पॅनलचे वर्चस्व कायम राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, **‘स्वर्गीय अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’**च्या माध्यमातून प्रस्थापित सहकार पॅनलला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनात स्व. अजितदादा पवार यांच्या योगदानाचा मुद्दा पुढे करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी या निवडणुकीत स्वतंत्र राजकीय समीकरण उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निकालात परिवर्तन पॅनलला दोन जागांवरच समाधान मानावे लागले.

उद्याच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष

‘सहकार’ पॅनलकडे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपदाची निवड त्यांच्या गोटातून होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय बुधवारी होणाऱ्या विशेष सभेतच स्पष्ट होणार आहे.

उपाध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडेही सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीनंतर जिल्हा बँकेच्या कारभाराची पुढील दिशा स्पष्ट होणार असून, आर्थिक अडचणी, बँकेवरील नियामक निर्बंध, शेतकऱ्यांना सक्षम आर्थिक सेवा आणि बँकेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया पुढे नेण्याचे आव्हान नव्या संचालक मंडळासमोर असणार आहे.

१८ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आता लोकनियुक्त संचालक मंडळाच्या हाती आलेल्या जिल्हा बँकेच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार, याची उत्सुकता जिल्ह्यात शिगेला पोहोचली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top