Mahabreaking

[breaking_news]

Dr. Rajendra Shingne :बुलढाणा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे; गोविंद मिरगे उपाध्यक्ष

Dr. Rajendra Shingne : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे गोविंद मिरगे यांची बिनविरोध निवड झाली. ‘घाटावर-घाटाखाली’चा राजकीय व भौगोलिक समतोल साधत झालेल्या या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हाती आली आहेत.

Rajendra Shingne

 ‘घाटावर-घाटाखाली’चा राजकीय समतोल; जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे शिंगणेंकडे

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे गोविंद मिरगे यांची बिनविरोध निवड झाली. ‘घाटावर-घाटाखाली’चा राजकीय व भौगोलिक समतोल साधत झालेल्या या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हाती आली आहेत.

जिल्हा बँकेच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदासाठी गोविंद मिरगे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणुकीची आवश्यकता भासली नाही आणि दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी तब्बल १९ जागांवर विजय मिळवला होता. या निकालातून संचालक मंडळावर या गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे अध्यक्षपदाची धुरा डॉ. शिंगणे यांच्याकडेच जाणार, अशी राजकीय चर्चा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू होती.

‘घाटावर’ शिंगणे, ‘घाटाखाली’ मिरगे

जिल्ह्यातील राजकीय आणि भौगोलिक समीकरणांचा ताळमेळ साधत अध्यक्षपद ‘घाटावर’ असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना, तर उपाध्यक्षपद ‘घाटाखाली’ असलेल्या गोविंद मिरगे यांना देण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्हा बँकेच्या सत्तेत प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सहकार क्षेत्रात सामायिक सत्ता समीकरण जुळवून आणण्यात आल्याचे या निवडीवरून स्पष्ट झाले आहे. या निवडीमागील राजकीय समीकरणे आणि पदवाटपाची रूपरेषा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे झालेल्या बैठकीत निश्चित झाल्याची चर्चा आहे.

सहकारातील ‘किंगमेकर’ पुन्हा केंद्रस्थानी

सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, राजकीय वजन आणि प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा बँकेच्या नेतृत्वाची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली आहेत. संचालक मंडळावर ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व आणि त्यानंतर झालेली बिनविरोध अध्यक्षपदाची निवड यामुळे सहकार क्षेत्रातील डॉ. शिंगणे यांची प्रभावी पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या कारभाराला आगामी काळात कोणती दिशा मिळते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विशेषतः शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित प्रश्नांवर बँकेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

निवडीची अधिकृत घोषणा होताच बँक परिसरात उपस्थित समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. समर्थकांनी डॉ. राजेंद्र शिंगणे आणि गोविंद मिरगे यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top