Mahabreaking

[breaking_news]

Kharif crops: वाडी अदमपूर परिसरात पावसाअभावी खरिप पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Kharif crops: गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने वाडी अदमपूर परिसरातील खरिप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पावसाचा खंड दिवसेंदिवस वाढत असल्याने नदी-नाले, शेततळी आणि बंधारे कोरडेठाक पडले असून, खरिप पिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे.

 

Kharif crops
सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पावसाची दडी; उत्पादन घटण्याची भीती

वाडी अदमपूर : गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने वाडी अदमपूर परिसरातील खरिप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पावसाचा खंड दिवसेंदिवस वाढत असल्याने नदी-नाले, शेततळी आणि बंधारे कोरडेठाक पडले असून, खरिप पिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. सुरुवातीच्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली, तसेच पिकांची वाढही जोमाने झाली. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
मात्र, सध्या सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असतानाच पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेंगा भरण्याच्या अवस्थेत सोयाबीन पिकाला जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक असतो. मात्र, पावसाअभावी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील पिकांना पाण्याचा ताण जाणवू लागला आहे.
खरिप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके तसेच अंतर्गत मशागतीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. अशा परिस्थितीत पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनच्या शेंगा पूर्णपणे भरतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी सोयाबीनचे दाणे बारीक राहण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, ते पिकांना पाणी देऊन ती वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. दरम्यान, पावसाअभावी काही ठिकाणी बुरशीजन्य ठिपके तसेच शेंगांवर करपा आढळून येत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने आज ना उद्या पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही दमदार पाऊस झालेला नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसाचा खंड आणखी लांबल्यास खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून, आधीच बियाणे, खते व मशागतीवर मोठा खर्च केलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top