Mahabreaking

[breaking_news]

Dongaon Bus Stand: डोणगाव बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा; ‘बस उभी करायची कुठे?’ चालक-वाहकांचा संताप

Dongaon Bus Stand: महामार्गावर असलेल्या डोणगाव येथील बसस्थानक परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे एसटी बस उभ्या करण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नसल्याने चालक आणि वाहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा मांडली.

Dongaon Bus Stand:

डोणगाव : महामार्गावर असलेल्या डोणगाव येथील बसस्थानक परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे एसटी बस उभ्या करण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नसल्याने चालक आणि वाहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा मांडली.

डोणगाव हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी व प्रवासी केंद्र असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बसस्थानक परिसरातील राज्य महामार्गावर अनधिकृत टपऱ्या, फळविक्रेते आणि खासगी वाहनांचा अक्षरशः विळखा पडला आहे. परिणामी, बस चालकांना रस्त्यावरच बस उभी करावी लागत असून त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे. प्रवाशांनाही बसमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बसस्थानक परिसरात सुरक्षित हालचालीसाठी जागाच उरलेली नसल्याने नागरिकांमध्येही नाराजी वाढत आहे.

दरम्यान, गुरुवारी बस उभी करण्याच्या कारणावरून बसस्थानक परिसरात वाद निर्माण झाला. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणधारक जागा रिकामी करण्यास तयार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला. वाहतूक नियंत्रक अंजूर भोसले यांच्यासह चालक-वाहकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून समस्या मांडली.

“आम्ही वेळेवर बस घेऊन येतो, पण बसस्थानकाजवळ पोहोचताच तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागते. प्रवाशांच्या रोषालाही आम्हालाच सामोरे जावे लागते. अनधिकृत अतिक्रमण हटविल्याशिवाय सुरक्षित सेवा देणे अशक्य आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका बस चालकाने व्यक्त केली. दरम्यान, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाकडून या अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी हप्तेखोरीमुळेच अतिक्रमणधारकांना अभय मिळत असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन बसस्थानक परिसर अतिक्रमणमुक्त करणार का, की एखाद्या मोठ्या अपघातानंतरच हालचाल होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top