worker steals jewellery :घरकामासाठी येणाऱ्या महिलेनेच घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, रामदासपेठ पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून चोरीतील सुमारे १ लाख ५५ हजार ६९२ रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

कौशल्यपूर्ण तपासाने उघडकीस आली घरफोडी; चोरीचे सोन्याचे दागिने जप्त, महिला अटकेत
अकोला : घरकामासाठी येणाऱ्या महिलेनेच घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, रामदासपेठ पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून चोरीतील सुमारे १ लाख ५५ हजार ६९२ रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता राजेश गुप्ता (वय ५५, रा. स्वामी आर्केड, जठारपेठ, अकोला) यांनी २७ मे २०२६ रोजी रामदासपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरी काम करणारी महिला १४ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत काम करून गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी कपाटातील तीन सोन्याच्या अंगठ्या (१२ ग्रॅम) आणि सोन्याचे कानातील टॉप्स (३ ग्रॅम) असा एकूण सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले. संबंधित महिला त्यानंतर कामावरही आली नसल्याने तिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला.
या फिर्यादीवरून रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९४/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी विशेष पथक तयार केले. गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे संशयित महिलेला महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत तिने चोरीची कबुली दिली.तपासादरम्यान आरोपी महिलेने चोरीतील सोन्याचे दागिने दर्यापूर येथील विविध सोनारांकडे विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई करून वितळविण्यात आलेले १२ ग्रॅम ८८० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड, ज्याची बाजारभावानुसार किंमत १ लाख ५५ हजार ६९२ रुपये आहे, हस्तगत केले. या कारवाईमुळे गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश लांडे, संदीप वानखाडे, पोलीस कॉन्स्टेबल रोशन पठाण, अमर इंगळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मिताली राऊत तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र खंडारे यांनी सहभाग घेतला.

