Unseasonal Rains :शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही काळ गारपिटीसह झालेल्या या पावसामुळे शहरातील व्यापारी, रस्त्यालगतचे लघु व्यावसायिक आणि बाजारपेठेतील नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
उकाड्यानंतर दिलासा, पण व्यावसायिकांचे नुकसान; गारपिटीने बाजारपेठ विस्कळीत
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरासह परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही काळ गारपिटीसह झालेल्या या पावसामुळे शहरातील व्यापारी, रस्त्यालगतचे लघु व्यावसायिक आणि बाजारपेठेतील नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिकांसह सजीव प्राणी उकाड्याने हैराण झाले होते. कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही-लाही होत असताना अचानक आलेल्या वाऱ्यासह पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. मात्र, या पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
शहरातील बसस्थानक चौक, रस्त्यालगतचे हातगाडी व्यावसायिक तसेच लहान दुकानदार यांना अचानक आलेल्या पावसामुळे माल वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. काही ठिकाणी व्यापाऱ्यांना साहित्य सुरक्षित करण्यासाठी आटापिटा करताना पाहायला मिळाले.
दरम्यान, बाजार समिती परिसरातील मार्केट यार्डात वाळत घातलेले धान्य झाकण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे धान्याचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.
अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी दीर्घकाळाच्या उकाड्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने शहरवासीयांनी काहीसा दिलासा व्यक्त केला. सायंकाळच्या वेळी तापमानात झालेली घट नागरिकांसाठी सुखद ठरल्याचे बोलले जात आहे.


