Daylight Theft : तालुक्यातील देऊळगावमही येथे भरदिवसा एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे चार लाख रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगावमही येथे भरदिवसा एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे चार लाख रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैययद कडु सैययद बुर (वय ६७, रा. मेंडगाव, ता. देऊळगाव राजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. २४ मे रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास ते देऊळगावमही येथील दिग्रस चौक परिसरात उपस्थित होते. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३९.९०० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लंपास केली.
चोरीस गेलेल्या सोन्याच्या चैनची अंदाजे किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४५/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून परिसरातील माहिती, संशयित हालचाली आणि इतर बाबींची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने वापरताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

