Deal to reduce stamp duty: शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराला पुन्हा एकदा चपराक बसली असून, नोंदणी व मुद्रांक विभागातील सहायक जिल्हा निबंधक (वर्ग-१) किरण चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. शासकीय शुल्क कमी करून देणे आणि संबंधित दस्तऐवज तातडीने प्रमाणित करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुद्रांक शुल्क कमी करून दस्त प्रमाणित करण्यासाठी मागितली लाच; अकोला एसीबीची धडक कारवाई
अकोला : शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराला पुन्हा एकदा चपराक बसली असून, नोंदणी व मुद्रांक विभागातील सहायक जिल्हा निबंधक (वर्ग-१) किरण चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. शासकीय शुल्क कमी करून देणे आणि संबंधित दस्तऐवज तातडीने प्रमाणित करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा एमआयडीसी, अकोला येथे उद्योग असून त्यांनी व त्यांच्या भागीदाराने २०२३ मध्ये एमआयडीसीतील एन-२५७ क्रमांकाचा प्लॉट भाडेतत्त्वावर घेतला होता. हा प्लॉट पत्नीच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक भाडेपट्टा दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क निश्चित करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.
तपासादरम्यान संबंधित प्लॉटवरील मुद्रांक शुल्क २ लाख ६७ हजार २७० रुपयांवरून ९७ हजार ३१० रुपये इतके कमी निश्चित करण्यात आले. तसेच दस्त क्रमांक ३०९१ तातडीने प्रमाणित करून देण्यासाठी सहायक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

२४ जून रोजी एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २५ जून रोजी सहायक जिल्हा निबंधक कार्यालयात सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान किरण चौधरी यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी आरोपी किरण चौधरी यांच्याविरुद्ध अकोला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर, पोलीस निरीक्षक प्रवीण वेरूळकर, अतुल इंगोले तसेच एसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्याच्या वतीने काम करणारी व्यक्ती शासकीय शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवून तक्रारीवर तातडीने कारवाई केली जाईल, तसेच सापळा कारवाईत वापरण्यात आलेली रक्कम नियमानुसार परत दिली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

