Complaints yield no results : शहरातील प्रभात क्र. ४ (अ, ब) अंतर्गत येणाऱ्या चूडीमहेल, चाँवलपुरा, आजमपुरा आणि कसरखेडा परिसरात दीर्घकाळापासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी शुक्रवारी महावितरण कार्यालयात धडक देत निषेध व्यक्त केला.

२०० केव्ही डीपीची मागणी प्रलंबित; आंदोलनाचा इशारा देत नागरिकांचा महावितरणवर धडक मोर्चा
बाळापूर : शहरातील प्रभात क्र. ४ (अ, ब) अंतर्गत येणाऱ्या चूडीमहेल, चाँवलपुरा, आजमपुरा आणि कसरखेडा परिसरात दीर्घकाळापासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी शुक्रवारी महावितरण कार्यालयात धडक देत निषेध व्यक्त केला.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे कार्यकर्ते सय्यद बरकत अली यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी परिसरातील वाढत्या वीजभाराचा विचार करून २०० केव्ही क्षमतेचा नवीन वितरण रोहित्र (डीपी) बसविण्याची मागणी पुन्हा एकदा केली. यापूर्वीही अनेक वेळा लेखी निवेदने देऊन ही मागणी करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वारंवार कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती विद्युत उपकरणे नीट सुरू राहत नाहीत. तसेच नागरिकांना दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरणकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी नागरिक तक्रार मांडण्यासाठी महावितरण कार्यालयात पोहोचले असता तेथे जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
दरम्यान, परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवून २०० केव्ही क्षमतेचा नवीन डीपी बसविण्याची मागणी पूर्ण न झाल्यास चूडीमहेल, चाँवलपुरा, आजमपुरा आणि कसरखेडा परिसरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी माजी नगरसेवक डॉ. फैयाज हुसेन, सय्यद बरकत अली, शेख फरहान, सय्यद तनवीर उर्फ तन्नू, बब्बया भाऊ (ड्रायव्हर), जानी भाऊ, अकील अहमद यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

