Mahabreaking

[breaking_news]

Sri Rama Navami festival :शेगावात भक्तिरसाचा दरवळ; १३२ वा श्रीरामनवमी उत्सव भक्तिभावात संपन्न

Sri Rama Navami festival :श्री गजानन महाराज संस्थान यांच्या वतीने आयोजित १३२ वा श्रीरामनवमी उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक धार्मिक विधींनुसार संपन्न झाला. दि. १९ मार्च ते २६ मार्च या कालावधीत पार पडलेल्या या उत्सवात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.

Sri Rama Navami festival
नामस्मरण, कीर्तन आणि दिंड्यांचा जयघोष; ‘जय श्रीराम’च्या गजरात भक्तीची पर्वणी

शेगाव : श्री गजानन महाराज संस्थान यांच्या वतीने आयोजित १३२ वा श्रीरामनवमी उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक धार्मिक विधींनुसार संपन्न झाला. दि. १९ मार्च ते २६ मार्च या कालावधीत पार पडलेल्या या उत्सवात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.
उत्सवकाळात दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होत होती. त्यानंतर गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ आणि रात्री श्रीहरी कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत होता. विविध भागांतून आलेल्या हरिभक्त परायण कीर्तनकारांनी श्रीराम चरित्राचे गोड कीर्तन सादर करत भक्तांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली.
चैत्र शुद्ध पाचपासून सुरू झालेल्या श्री अध्यात्म रामायण स्वाहाकाराची चैत्र शुद्ध नवमीला विधिवत पूर्णाहुती करण्यात आली. दुपारी श्रीराम जन्मोत्सवाच्या कीर्तनानंतर “जय श्रीराम”च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि मंगल वाद्यांच्या सुरावटीत प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाला.
यावर्षी उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ९५२ भजनी दिंड्यांचा सहभाग. त्यापैकी नियमांची पूर्तता करणाऱ्या ११९ नव्या दिंड्यांना टाळ, वीणा, मृदंग तसेच संत वाङ्मय—ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत—यांचे वितरण करण्यात आले. यामुळे वारकरी परंपरेला बळकटी मिळाली आहे. जुन्या दिंड्यांनाही भजनी साहित्य दुरुस्तीसाठी सानुग्रह मदत देण्यात आली.
भाविकांसाठी विसावा संकुलात भोजनप्रसाद, प्रथमोपचार आणि निवासाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. केवळ शेगावच नव्हे, तर पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर आदी संस्थेच्या शाखांमध्येही उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. या सर्व ठिकाणी मिळून सुमारे १ लाख ३० हजारांहून अधिक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. एकूणच, भक्ती, सेवा आणि समर्पण यांचा संगम असलेला हा श्रीरामनवमी उत्सव भाविकांच्या मनात अध्यात्मिक ऊर्जा जागवणारा ठरला. “श्रींच्या कृपेने भाविकांची सेवा घडली,” अशी भावना संस्थानतर्फे व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top